नाशिक : पॅसेंजर टर्मिनल बांधून तयार झालेल्या ओझरच्या विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याची सर्व तयारी पूर्ण झाली असली तरी अद्याप स्थिर स्वरूपात कोणतीही सेवा सुरू झालेली नाही. मात्र, एचएएलच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अनेक कंपन्यांनी तयारी दर्शविली असून, सोमवारी (दि.३०) याबाबत फैसला होणार आहे.एचएएलने विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या परिषदेनंतर निविदा मागविल्या होत्या. त्या निविदांची अंतिम मुदत संपल्यानंतर सोमवारी निविदा उघडल्या जाणार आहेत. त्यातून कंपनी निश्चित होण्याची शक्यता आहे.नाशिकमधून नागरी हवाई सेवा सुरू करण्याची अनेक वर्षांपासून मागणी होती तरी आजवर अनेक अडचणी आणि नंतर व्यवहार्यतेचा अडथळा याचा परिणाम म्हणून आजवर ही सेवा सुरू झाली नाही. मध्यंतरी पॅसेंजर टर्मिनल नसल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राज्यशासनाने ही मागणीही पूर्ण केली आणि ८० कोटी रुपयांची सुसज्ज इमारत बांधण्यात आली, परंतु त्यानंतर स्थिर स्वरूपाची विमानसेवा सुरू झाली नाही. मेहेर आणि श्रीनिवास एअरलाइनच्या सुरू झालेल्या हौशी सेवाही बंद झाल्या. त्यामुळे एकंदरच नाशिकच्या विमानसेवेविषयी नकारात्मक चर्चा पसरू लागली, परंतु दरम्यानच्या काळात डीजीसीएच्या नकाशावर नाशिकचे नाव आल्याने त्याचा होणारा फायदा, पॅसेंजर टर्मिनलचे एचएएलकडे झालेले हस्तांतर याचा फायदा झाला असून, त्यातून त्यामुळे एचएएलच्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळेल असे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.३०) निविदा उघडण्यात येणार आहे. त्यामुळे विमानसेवेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. नाशिक ते मुंबई विमानसेवा अनेकदा तर पुणे सेवा एकदा सुरू होऊन बंद पडल्यानंतर आता किमान मुंबई नको म्हणण्याची वेळ आली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे कंपन्या नाशिकला कोणत्या अर्थाने प्राधान्य देतात याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)
नाशिकच्या विमानसेवेचा आज फैसला?
By admin | Published: November 29, 2015 10:46 PM