अझहर शेख, नाशिक : सौदी अरेबिया देशातील मक्का-मदिना शहरात २०२४साली होणाऱ्या हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. हज कमिटी ऑफ इंडियाच्या मुंबई येथील हज हाउसध्ये राज्यभरातून आतापर्यंत सुमारे १२ हजार ऑनलाइन अर्ज इच्छुक यात्रेकरूंचे प्राप्त झाले आहे. २०२४साली होणाऱ्या हज यात्रेकरीता नाशिक शहरातून ३२० तर मालेगावमधून ८०० असे एकुण सुमारे १,१२० अर्ज आतापर्यंत भरण्यात आले आहे.
इस्लामच्या पाच मुलस्तंभांपैकी एक स्तंभ ‘हज’ आहे. धार्मिकदृष्ट्या विशेष महत्व प्राप्त असलेल्या हज यात्रेसाठी दरवर्षी राज्यासह देशातून मोठ्या एक लाखापेक्षा जास्त मुस्लीम बांदव जातात. २०२४ साली होणाऱ्या हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. २० डिसेंबर अखेरची मुदत होती; मात्र भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची मुदतीत वाढ केली आहे. यानुसार १५ जानेवारी २०२४ ही ऑनलाइन अर्ज भरण्याची आता अखेरची तारीख असल्याचे परिपत्रक हज कमिटी ऑफ इंडियाकडून काढण्यात आले आहे.
भारत देशासाठी सौदी अरेबिया सरकारकडून २०२४ साली होणाऱ्या हज यात्रेसाठी १ लाख ७५ हजार यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. देशभरातून आतापर्यंत हज कमिटी ऑफ इंडियाकडे ८० हजार अर्ज देशभरातून प्राप्त झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. अजुनही कोटा शिल्लक असून इच्छुक व पात्र नागरिकांनी हज यात्रेकरिता ऑनलाइन अर्ज सादर करावे, असे आवाहन नाशिक शहरातील खादिमुल्ल हुज्जाज ग्रुपचे हाजी हमीद खान, हाजी मोईन खान, नईम मुल्ला यांनी केले आहे. इच्छुक भाविकांनी येत्या १५ जानेवारीपर्यंत अर्ज केल्यास त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहे. यासाठी भारतीय नागरिकाचे आंतरराष्ट्रीय वैध पासपोर्ट असणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांमधून हज हाऊसमध्ये छाननी झाल्यानंतर जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीमध्ये भाग्यवंत सोडत जाहिर होण्याची श्यक्यता वर्तविली जात आहे. यानंतर अंतीम यात्रेकरूंची यादी व प्रतीक्षा यादी जाहिर केली होईल.
एकुण ४० दिवसांची यात्रा :
हज यात्रा ही एकुण ४० दिवसांची असते. यामध्ये ३० दिवस हे मक्का शहरामध्ये तर उर्वरित दहा दिवस हे मदिना शहरामध्ये भाविकांचे वास्तव्य असते. पुढील वर्षी १७ जून रोजी बकरी ईद (ईद-उल-अज्हा) आहे. यापुर्वी चार ते पाच दिवसांअगोदर यात्रेकरू मक्का शहरात दाखल होणार आहे. या यात्रेसाठी प्रत्येकी यात्रेकरूनला सुमारे साडे तीन ते चार लाख रूपयांपर्यंत एकुण खर्च येतो. महाराष्ट्रातून दुसऱ्या टप्प्यात विमानांचे उड्डाण होते.