- अझहर शेख
नाशिक - दारूची पार्टी करण्यासाठी एकत्र आलेल्या मित्रांमध्ये शाब्दीक वाद होऊन आपआपसांत हाणामारी झाली. यावेळी एकाने त्याच्याजवळ असलेले धारधार शस्त्र काढून सोबत असलेल्या मित्राच्या पोटात भोसकले. यानंतर दोघांनी रक्तबंबाळ अवस्थेत जखमी मित्राला शनिवारी (दि.२६) मध्यरात्री जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत विश्वनाथ उर्फ बबलू भिमराव सोनवणे (२७,रा.रामेश्वर कॉलनी) हा मृत्युमुखी पडला होता. यावेळी संशयितांनी अपघातात जखमी झाल्याने मित्र दगावल्याचा बनावही केला; मात्र पोलिसांना घातपाताचा संशय आल्याने त्यांनी कौशल्याचा वापर करत बनाव उघडकीस आणला.
गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत शिवाजीनगर भागात शनिवारी रात्री संशयित आरोपी समेशर रफिक शेख (४०,रा.कार्बननाका), दिपक अशोक सोनवणे (रा.श्रमिकनगर) हे दोघे व बबलू सोनवणे हादेखील त्यांच्यासोबत मद्यप्राशनासाठी एकत्र आले. हे तीघेही एकमेकांचे जुने मित्र असून शेख याच्यावर यापुर्वी दोन किरकोळ स्वरुपाचे गुन्हे आहेत. तो कार्बननाका येथे चिकन शॉपी चालवतो. यावेळी शेख व बबलू यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. दिपक यानेही बबलूला मारहाण करण्यास सुरूवात केली. दोघांनी सुरूवातीला हाताने त्याला मारहाण केली. याचवेळी शेख याने त्याच्याजवळ असलेल्या धारधार शस्त्राने त्याच्यावर वार केले. वर्मी घाव लागल्याने बबलू रक्ताच्या थारोळ्यात कोसळून मृत्युमुखी झाला असे पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संशयितांनी दुचाकीवरून एका खासगी रूग्णालयात बबलू यास नेले. तेथे त्याच्या जखमेवर काहीतरी पट्टी लावून रूग्णालयाच्या रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात रात्री दोघांनी उपचारासाठी दाखल केले. यावेळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून बबलू यास मयत घोषित केले. बबलू हा अधूनमधून बदली वाहनचालक म्हणून कंपनीच्या वाहनांवर रोजंदारीने काम करण्यासाठी जात होत. तो अविवाहित होता. दोघा संशयितांविरूद्ध बबलू याचा भाऊ ज्ञानेश्वर भीमराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापुर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...असा झाला घातपात उघड!मित्राला शस्त्राने भोसकले व त्यास जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणून अपघातात जखमी झाल्याचा बनाव दोघा संशयितांनी रचला; मात्र तेथे एका गुन्ह्यातील संशयितांच्या वैद्यकिय तपासणीसाठी आलेल्या अंबड गुन्हे शाेध पथक व जिल्हा रूग्णालयातील पोलिस चौकीवरील रात्रपाळीला असलेल्या दोघा कर्मचाऱ्यांना या संशयितांवर वर्तणुकीवर संशय आला. त्यांनी डॉक्टरांना मयताच्या जखमेवरील बॅन्डेजपट्टी काढण्यास सांगितले. यानंतर जखमेची पाहणी केली असता शस्त्राने भोसकल्याची खात्री पटली. वैद्यकिय अधिकाऱ्यांनीही त्यास दुजोरा दिला. तसेच दाेघा संशयितांपैकी एकाच्या अंगावरील कपडेसुद्धा पुर्णपणे रक्ताने माखलेले होते. यामुळे पोलिसांनी संशयावरून त्यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
खूनाची घटना अचानकपणे शाब्दिक वादातून घडली. मयत युवक व दोघे संशयित आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार नाहीत. शेख याच्यावर किरकोळ गुन्हे असून त्यापैकी एक अपघाताचा आहे. त्यांची जुनी मैत्री होती. यामुळेच ते तीघे एकत्र शिवाजीनगर येथे शनिवारी संध्याकाळी बसले होते. शाब्दीक वाद होऊन त्याचे पर्यावसन खूनात झाले. पोलिसांनी वेळीच कौशल्याचा वापर करत दोघा मित्रांना ताब्यात घेत तासाभरात गुन्हा उघडकीस आणला.- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपआयुक्त