नाशिक : विजय मोरे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यांमधील आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात गत दोन वर्षांमध्ये ६ ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे़ जिल्हा न्यायालयात शहर पोलीस आयुक्तालयातील प्रॉसिक्युशन सेल तर ग्रामीण पोलीस दलातील ट्रायल मॉनिटरिंग सेलमधील पोलीस कर्मचारी, सरकारी वकील व साक्षीदार या तिघांच्या सामूहिक प्रयत्नामुळे आरोपी शिक्षेपर्यत पोहोचत आहेत़ विशेष म्हणजे नाशिक जिल्हा न्यायालय हे आरोपींना शिक्षा देण्यात राज्यात अग्रेसर ठरले आहे़शहर पोलीस आयुक्तालय तेरा तर ग्रामीण भागातील चाळीस पोलीस ठाण्यांमध्ये किरकोळ व गंभीर अशा दोन्ही स्वरूपातील हजारो गुन्ह्यांची नोंद दरवर्षी होते़ यापैकी अनेक गुन्ह्यांतील संशयितांची न्यायालयात पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली जाते़; मात्र गत दोन वर्षांपासून शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात शिक्षा होण्याचे प्रमाण ६ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढले असून, पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या संशयितांची संख्या ७९५ आहे़ पोलिसांची काळानुरूप बदललेली गुन्ह्याची तपास पद्धती, सरकारी वकिलांचे परिश्रम तसेच साक्षीदारांनी न्यायालयात न घाबरता दिलेली साक्ष यामुळे शिक्षेच्या प्रमाणात ही समाधानकारक वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे़ नाशिक शहरात चोरी, हाणामारी, घरफोडी, खंडणी, जिवे मारण्याचा प्रयत्न, खून, बलात्कार, विनयभंगासारखे अनेक गुन्हे दाखल होत असतात. या गुन्ह्यांमध्ये दरवर्षी वाढ होते. २०१५ साली २५ प्रकारचे गुन्हे मिळून ३ हजार ६२० गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार ६९ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तर २०१६ मध्ये गुन्ह्यांमध्ये घट होऊन ३ हजार ५३८ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी २ हजार १९६ गुन्हे उघडकीस झाले.न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये निकालही लागले असून, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींना शिक्षा करण्याचे प्रमाण अधिक आहे़ ४५३ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून, ६७५ संशयिताना पुराव्यांअभावी निर्दोेष सोडण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण २०१४ साली ३२.१० टक्के होते. त्यानंतर २०१५ मध्ये यात घट झाल्याने ते प्रमाण २५.३१ टक्के झाले; मात्र २०१६ मध्ये यात वाढ होऊन ४०.१६ टक्के प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयातील गुन्ह्यांमध्येही शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ३३ गुन्हेगारांना शिक्षा झाली, तर १२० गुन्हेगार निर्दोष सुटले आहेत. २०१५ चा विचार करता गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते़ नाशिक ग्रामीण पोलीस दलानेही जिल्हा व सत्र न्यायालयात गुन्हे दोषसिद्धी विभाग (ट्रायल मॉनिटरिंग सेल) कार्यान्वित केला आहे़ या सेलमार्फत साक्षीदारांना न्यायालयीन प्रक्रियेची माहिती करून दिली जाते़ सरकारी वकील, साक्षीदार व पोलीस या तिघांच्याही सामूहिक प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात समाधानकारकरीत्या वाढ झाली आहे़
आरोपींना शिक्षा देण्यात राज्यात नाशिक अग्रेसर
By admin | Published: March 20, 2017 10:57 PM