नाशिक : ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या आणि अखेर पर्यंत पर्यावरणस्नेही जीवन शैलीचे व्रत अंगिकारणाऱ्या वासंतीताई सोर यांचे रविवारी रात्री वृद्धपकाळाने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. काल रात्री नाशिक शहरातील पंडीत कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
वर्धा येथे जन्मलेल्या वासंतीताई यांचे वडील महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने शाळा चालवत. त्यामुळे त्यांना बालपणी गांधीजींना पाहण्याचे आणि त्यांच्या अंगाखांद्यावर खेळण्याचे भाग्य त्यांना मिळाले. त्यानंतर त्यांनी सतत गांधीजींच्या विचारांचा प्रचार, प्रसार केला आणि त्यावर पुस्तके लिहिली. विशेषतः गांधीजी यांच्याविषयी पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजाबाबत महाविद्यालयात व्याख्याने दिली.
विनोबा भावे यांचे कार्य जवळून पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. जीवन उत्सव या पर्यावरण स्नेही जीवन शैलीचा पुरस्कार करताना त्यांनी आयुष्यभर खादीचे कपडे वापरले. अंबर चरख्यावरून सूत कताई करण्याचे प्रशिक्षण देखील त्या देत. गांधी जयंतीच्या दिवशी हुतात्मा स्मारकात मौन बाळगून दोन सूत कताई करण्याचे काम त्यांनी अलीकडे पर्यंत केले. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि नातवंड असा परिवार आहे.