नाशिक : नाशिकमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर नाशिकला चार हजार अॅँटिजेन किट प्राप्त झाले आहेत. अवघ्या १० मिनिटांत टेस्टचा अहवाल देणाऱ्या या किटचा वापर प्रामुख्याने हाय रिस्क पेशंटसाठी तसेच कंटेन्मेंट झोनमधील रुग्णांसाठी करता येणार आहे.गत पंधरवड्यात सहापेक्षा अधिक वेळा दोनशेहून अधिक बाधित आढळून आल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. तसेच अहवाल प्रलंबित राहण्याच्या प्रमाणातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. महानगरात वाढत असणारे बहुतांश रुग्ण हे बाधितांच्या नात्यागोत्यातील आणि निकटवर्तीयांपैकी आहेत. अशा परिस्थितीत बाधितांचे निकटवर्तीयांच्या जर झटपट चाचण्या झाल्या आणि त्यात जे बाधित आढळतील त्यांना त्वरित दाखल करून बाधितांची संख्या नियंत्रणात येणे शक्य होऊ शकणार आहे. जगातील विविध देशांमध्ये झटपट तपासणीसाठी हे किट वापरले जातात. दक्षिण कोरियाच्या एका कंपनीने निर्माण केलेल्या या किटचे शास्त्रोक्त नाव स्टॅँडर्ड क्यू कोविड- १९ एजी डिटेक्शन किट असे आहे. भारतात दिल्लीसारख्या सर्वाधिक बाधा झालेल्या राज्यातही या एजी डिटेक्शन किटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून, भारताच्या विविध राज्यांतून या किटला मोठी मागणी आहे. बाधितांच्या संपर्कातील आणि संशयितांची चाचणी त्वरित झाल्यास अशा रुग्णांवर तातडीने उपचार होऊन त्यांच्यापासून पुढे होणारा संसर्ग रोखता येऊ शकतो, ही या अॅँटिजेन किट चाचणीची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरकडे सुमारे पाच हजार टेस्टिंग किटची मागणी केली होती. त्या तुलनेत एक हजार कमी किट प्राप्त झाले असले तरी प्रारंभिक टप्प्यासाठी त्या पुरेशा ठरणार आहेत.नाशिक महापालिकेकडून आयसीएमआरकडे अॅँटिबॉडी टेस्ट किटचीदेखील मागणी करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत त्या टेस्टकिटदेखील नाशिकला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास आणि कंटन्मेंट झोन, हाय रिस्क पेशंट किंवा बाधितांचे निकटवर्ती संशयित यांना जरी त्या किटचा उपयोग करणे शक्य झाले, तर नाशकातील कोरोनाला लवकरात लवकर आटोक्यात आणण्याच्यादिशेने त्या किट उपयुक्त ठरणार आहेत.
या प्रत्येक किटमधील अहवालाची नोंद आयसीएमआर या राष्टÑीय संस्थेकडे करावी लागते. त्यामुळे या किट दाखल झाल्यानंतर या किटचे प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानुसार मनपाने आयसीएमआरकडे या किटचे रजिस्ट्रेशन सोमवारी केले असून, मंगळवारपासून चाचण्यांना प्रारंभ करता येणार आहे.- डॉ. आवेश पलोड, मेडिकल नोडल आॅफिसर, झाकीर हुसेन रुग्णालय