नाशिक : एसपीएमसीएल व रिझर्व्ह बॅँकेने नाशिकला पेपर मिल होण्यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तपासला आहे. त्यानुसार नाशिकला पेपर मिल होण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल व्यवहार्य झाल्यास त्याचा विचार करून नाशिकला पेपर मिल सुरू करण्याची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येईल, या आशयाचे पत्र केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी आपल्याला पाठविल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.केंद्र शासनाची कागद निर्मिती १६ लाख मेट्रिक टन उत्पादन इतकी सध्या आहे. शासकीय कामासाठी लागणारी कागदाची मागणी वाढत असून शासनाचे २०२४ पर्यंतचे उद्दिष्ट ४८ लाख मेट्रिक टन कागद निर्मितीचे आहे. त्यासाठी केंद्र शासन चार मशीन लाइन टाकणार आहे. त्यासाठी शासनाने याअगोदर दोन मशीन लाइन होशंगाबादसाठी करण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.इतर दोन ठिकाणी मशीन लाइनसाठी जागा शोधण्याचे काम केंद्र सरकारमार्फत सुरू होते. ही बाब इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाने खासदार हेमंत गोडसे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनतर गोडसे यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेऊन हा प्रकल्प नाशिकला झाल्यास केंद्र शासनाला किती किफायतशीर होऊ शकतो, याची सविस्तर माहिती दिली. तसेच याप्रकरणी लोकसभेतही सविस्तर निवेदन मांडले. (प्रतिनिधी)
नाशिकला पेपर मिलसाठी ‘अच्छे दिन’
By admin | Published: August 06, 2016 12:40 AM