नाशिक : खुल्या गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद जंप रोप स्पर्धेत महिलांच्या गटात नाशिकने, तर पुरुषांच्या गटात ठाणे संघाने अजिंक्यपद पटकाविले.
कालिका मंदिर संस्थानच्या हॉलमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यजमान नाशिकसह बीड, नांदेड, यवतमाळ, परभणी, अहमदनगर, जळगाव, रायगड, पालघर, धुळे, कोल्हापूर, औरंगाबाद, नंदुरबार, सोलापूर, गोंदिया, वर्धा चंद्रपूर, ठाणे, मुंबई, पुणे या जिल्ह्यांच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन नाशिक जिल्हा जंप रोप असोसिएशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र महाले, क्रीडा संघटक आनंद खरे, महाराष्ट्र जंप रोप असोसिएशनचे सचिव विक्रम दुधारे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत तीन मिनिट इंडूरन्स, ३० सेकंद डबल अंडर, तीस सेकंद स्पीड, तीन मिनिट रिले आणि सांघिक डेमो, आदी प्रकारांचा समावेश होता. विजेत्या स्पर्धकांना महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे खजिनदार पांडुरंग रणमाळ, शिवप्रसाद घोरपडे, राजेंद्र महाले, उदय खरे, विक्रम दुधारे, चिन्मय देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
इन्फो
या संघांची बाजी
या स्पर्धेत मुलांमध्ये ठाणे संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. नागपूरने उपविजेतेपद, तर यजमान नाशिकच्या संघाने तिसरा क्रमांक मिळविला, तर मुलींमध्ये यजमान नाशिकच्या महिला खेळाडूंनी विजेतेपद पटकाविले, तर ठाणे संघाच्या खेळाडूंनी उपविजेतेपद आणि गोंदियाने तिसरा क्रमांक मिळविला.