- सुयोग जोशी नाशिक - गळ्यात झेंडूची माळ, हातात टाक, गुलालाची उधळण अन विविध आकर्षक पेहराव करत ढोल ताशांच्या गजरात वीरांच्या मिरवणूकीने सोमवारी गोदाकाठ परिसर दणाणला. मिरवणुकीत जुने नाशिक, हिरावाडीसह पंचवटी परिसरातील शेकडो वीर सहभागी झाले होते. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीच्या दिवशी रामकूंड परिसरात वीरांची मिरवणूक काढण्याची परंपरा असून, यंदाही ही मिरवणूक काढण्यात आली. रामकुंडावर वाजतगाजत वीरांचे टाक आणून त्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर पुन्हा टाक वाजतगाजत घरी नेण्यात आले. घरी गेल्या तळी आरती करण्यात आली. मिरवणुकीत कृष्ण, बाल छत्रपती शिवाजी, बाल हनुमान, शंकर, देवी, नवरदेव, मावळे, मल्हार अशा विविध वेशभूषा करत वीर सजले असल्याचे चित्र दिसून आले. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण करण्यासाठी धुलीवंदनाला वीर नाचविण्यात आले. कुटुंबातील दिवंगत व्यक्तीचा चांदीचा, पितळी टाक बनवून ते टाक खोबऱ्याच्या वाटीत ठेऊन त्या भोवती लाल कपडा गुंडाळला होता. असाही आनंद द्विगुणितएका बाजुला सोमवार असल्याने कपालेश्वर महादेवाची आरती सुरू होती, दुसरीकडे गोदा आरतीचे पावन सूर कानी येत असतांनाच विरांच्या मिरवणूकीने नाशिककरांचा आनंद अधिकच द्विगुणित झाला. मिरवणूक पाहण्यासाठी जिल्ह्यासह शहराच्या विविध भागातून भाविकांनी गर्दी केली होती. रामकुंडाला यात्रेचे स्वरूपजुन्या नाशकातील बाशिंगे वीर, रविवार कारंजा येथील दाजिबा वीर आणि घनकर गल्लीतील येसोबा वीर यांची मिरवणूक प्रमुख आकर्षण ठरले. बाशिंगे विराची जुन्या नाशकातून दुपारी दोन वाजता वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी या विरांचे भाविकांनी विधिवत पूजन करून स्वागत केले. या विरांच्या मिरवणुकीने गोदाकाठ परिसराला यात्रेचा स्वरूप प्राप्त झाले होते. गोदेच्या चारही बाजूंकडून भाविकांचा लोंढा उशिरापर्यंत येत होता. त्यामुळे उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. ठिकठिकाणी वाहतुक ठप्पविरांच्या मिरवणुकीने रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, अशोक स्तंभ, मेनरोड, भद्रकाली, साक्षी गणेश परिसरासह मेहर सिग्नलसह होळकर पूलावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली. त्यामुळे वाहनचालकांचे हाल झाले. रविवार कारंजावर तर वाहतुक कोंडीने नागरिक हैराण झाले होते.
Nashik: ढोल-ताशांच्या गजरात गोदाकाठ परिसर दुमदुमला, वीरांची मिरवणूक पाहण्यासाठी लोटली गर्दी
By suyog.joshi | Published: March 25, 2024 9:19 PM