सिन्नर - पहिल्यांदाच होत असलेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्सुकता दिसून आली. सिन्नर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह सदस्यांच्या निवडणुकीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत होती.
सिन्नर तालुक्यातील आशापूर, डुबेरवाडी, कीर्तांगळी, कारवाडी, शास्त्रीनगर, नांदूरशिंगोटे, पाटपिंप्री, शहा, सायाळे, ठाणगाव, उजनी व वडगावपिंगळा या १२ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह ९८ सदस्यपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजता प्रारंभ झाला. सकाळपासून प्रत्येक केंद्रावर मतदानाला गर्दी दिसून आली.
१२ सरपंच व ९८ सदस्यांसाठी १२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होत आहे. २२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४२ मतदान केंद्रावर होत असलेल्या १२ गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६ निवडणूक अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली होती.
सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत या १२ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ३८ टक्के मतदान झाले होती. दुपारी दीड वाजता मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपास पोहचली होती. त्यानंतर दुपारी तीन वाजता मतदानाच्या टक्केवारीने ६० पर्यंत पोहचली होती. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नांदूरशिंगोटे व ठाणगाव येथे वादळी वाºयासह पावसाला प्रारंभ झाल्याने उमेदवार, कार्यकर्ते व मतदारांची धावपळ उडाली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करतांना दिसून येते होते. नांदूरशिंगोटे येथील सरपंचपद सर्वसाधारण असल्याने येथे मोठी चुरस दिसून आली. दुपारी तीन वाजेपर्यंत तालुक्यात शांततेत मतदान झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. वावी, सिन्नर व एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरु असणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.