नाशिक : द्राक्ष महाेत्सवामुळे जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळणार आहे. महोत्सवातून शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी प्रेरणा मिळेल. देशात सर्वात उच्च प्रतीच्या द्राक्षांचे उत्पादन नाशिकमध्ये होत असल्याने जिल्हा द्राक्ष उत्पादनाची राजधानी बनली आहे,असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. पर्यटन संचालनालयातर्फे आयोजित दोन दिवसीय द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि.२६) ग्रेप पार्क रिसोर्ट येथे झाले. याप्रसंगी खासदार गोडसे बोलत होते. व्यासपीठावर जगदीश होळकर, ट्रॅव्हल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे, दत्ता भालेराव,सुला वाईनचे उपाध्यक्ष संजीव पैठणकर,सोमा वाईनचे अधिकारी पाचपाटील,कृषीविभाग अधीक्षक सोनवणे उपस्थित होते. विकेंडची पर्वणी साधत पहिल्या दिवशी नाशिककरांनी महोत्सवास हजेरी लावली. उद्घाटन सोहळ्यापूर्वी सकाळी ८ वाजता ‘द ग्रेस ग्रेप एस्केप फॅमिली कार ट्रेझर हंट’ हा कार्यक्रम रंगला. त्यात २० कार सहभागी झाल्या होत्या. नाशिककरांना परिसरातील पर्यटनस्थळांची माहिती व्हावी, पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या ५३ प्रजाती ठेवल्या असून उपस्थितांनी त्याची माहिती जाणून घेतली. पर्यटन विभागाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महोत्सवात दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. २६) विनियार्ड व वायनरी टूरचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी नाशिकचा प्रसिद्ध एम.एच.१५ बँडसोबत म्युझिकल कार्यक्रम होईल. याशिवाय कॅलिग्राफी कार्यशाळा व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असेल. या महोत्सवात विविध वाणांच्या द्राक्षांची माहिती दिली जात असून नाशिककरांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे.महोत्सवातील उपक्रमांनी वेधले लक्ष उद्घाटन सोहळ्यानंतर ११ वाजता द्राक्षांपासून खाद्यपदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. वॉव ग्रुपने त्याचे संयोजन केले. दुपारी १ वाजता लोकनृत्य सादरीकरण झाले. सायंकाळी ४ वाजता आदिवासी वारली चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. आदिवासी कलाकार देवराम पारधी यांनी प्रात्यक्षिक सादर करून सहभागी कलारसिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आसमंतात नाशिक ढोल घुमला. शिवसंस्कृती ढोल ताशा पथकातील युवक,युवतींनी त्यात सहभाग नोंदवला. सायंकाळच्या फॅशन शो ने उपस्थितांचे लक्ष वेधले.कृषिमंत्र्यांनी दिली भेट कृषीमंत्री दादा भूसे आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महोत्सवास भेट देत पाहणी केली. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयाचा हा चांगला उपक्रम आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल,असे मत भूसे यांनी यावेळी व्यक्त केले.
नाशिक द्राक्ष उत्पादनाची राजधानी: खासदार हेमंत गोडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 2:34 AM
द्राक्ष महाेत्सवामुळे जिल्ह्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळणार आहे. महोत्सवातून शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी प्रेरणा मिळेल. देशात सर्वात उच्च प्रतीच्या द्राक्षांचे उत्पादन नाशिकमध्ये होत असल्याने जिल्हा द्राक्ष उत्पादनाची राजधानी बनली आहे,असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले.
ठळक मुद्दे द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन