नाशिक : शहरासह जिल्ह्याला येत्या चार दिवसांसाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. बुधवारपासून हवामानात बदल होण्यास सुरूवात झाली. गुरुवारी (दि.१६) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ढगांचा गडगडाटासह वीजांचा कडकडाटाच्या मोठ्या आवाजाने पुन्हा नाशिककरांची झोप उडाली. काही वेळेत मध्यम ते तीव्र सरींचा वर्षाव सुरू झाला. वाऱ्याचा वेग फारसा नसला तरी पहाटेपर्यंत पाऊस सुरु होता. नाशिकला गुरूवारसाठी ऑरेंज अलर्ट दर्शविण्यात आला होता.
नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यातसुद्धा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने निफाड, त्र्यंबकेश्वर, कळवण, सिन्नर या तालुक्यांमध्ये शेत पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या धक्क्यातून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा एकदा बेमोसमी पावसाचे ढग दाटून आले आहे. शुक्रवारपर्यंत (दि.१७) हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. गुरुवारी मध्यरात्री वादळी गडगडाटी पावसाने शहराला झोडपून काढले. यामुळे शेतकरी वर्गामध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडगडाटी अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतपीकांचे नुकसान झाले. दिवसभर ढगाळ हवामान कायम राहिले. रात्रीच्या बेमोसमी पावसामुळे वातावरणातील उकाडाही कमी झाला असून बुधवारी ३२.५ अंशापर्यंत पोहचलेले कमाल तापमान गुरुवारी थेट २४.७अंशापर्यंत खाली घसरले. तसेच किमान तापमानामध्येही अल्प प्रमाणात घट झाली आहे. बेमोसमी पाऊस अन् ढगाळ हवामानामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले दिसून आले. गुरुवारी सकाळी ८७टक्के तर संध्याकाळी ६१टक्के इतकी आर्द्रता नोंदविली गेली. शुक्रवारीदेखील हलका ते मध्यम स्वरुपाचा गडगडाटी पाऊस होऊ शकतो. तसेच सोसाट्याचा वाराही सुटण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.