ठळक मुद्देकमाल तपमान गेल्या वर्षाच्या तुलनेत १० अंशांनी अधिक गेल्या वर्षी ११ मार्च रोजी केवळ २७.६ अंश इतके कमाल तपमानहोते.
नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहराच्या कमाल-किमान तपमानाचा पारा चढता असून, शहर तापू लागले आहे. शहराचे कमाल तपमान रविवारी (दि.१०) ३६.३ अंशांपर्यंत तर किमान तपमानाचा पारा १८.४ अंशांपर्यंत स्थिरावल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा तीव्र स्वरूपात शहराला बसत आहे.मार्चचा पहिला आठवडा उलटला असून, उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ होत आहे. शनिवारी ३६.२ इतके कमाल अंश तपमान नोंदविले गेले. शनिवारपासून तपमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे सरकला आहे. रविवारी (दि.११) ३६.३ अंशांपर्यंत कमाल तपमान पोहचले. गेल्या वर्षी ११ मार्च रोजी केवळ २७.६ अंश इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते. यामुळे तपमानाचा पारा यंदा अधिक वाढत आहे. शहराचे कमाल तपमान गेल्या वर्षाच्या तुलनेत १० अंशांनी अधिक असल्याचे या दोन दिवसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होऊ लागली असून, उन्हापासून संरक्षणासाठी नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणात वातानुकूलित यंत्रे, पंख्यांचा वापर केला जात आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवू लागल्या. हवामानातही बदल झाला असून, मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी ३६.२, तर दुसºया दिवशी ३६.३ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते. त्यानंतर तपमानात काहीअंशी घट झाली असली तरी वातावरणातील उष्मा कायम टिकून राहिल्याने पुन्हा तपमानाचा पारा दहा दिवसांनी ३६ अंशांपुढे सरकला आहे. तीन दिवसांपासून दररोज संध्याकाळी पाच वाजता शहरात ढगाळ हवामान दाटून येत आहे. स्थानिक हवामानात उष्मा वाढल्यामुळे दुपारनंतर काही प्रमाणात ढग दाटून येत असल्याचे निरीक्षण हवामान केंद्राकडून नोंदविण्यात आले आहे.