घोटी : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात अखेर परिवर्तन घडले. काँग्रेसने इगतपुरीची जागा राखण्यात यश मिळवले. विद्यमान आमदार निर्मला गावित यांच्या तिसऱ्या हॅटिट्रकच्या स्वप्नांना काँग्रेस महाआघाडीचे हिरामण खोसकर यांनी सुरु ंग लावला. त्यांना ८६५६१ मतदारांनी कौल मिळाला. खोसकर यांनी ३१५५५ मतांनी एकतर्फी विजय संपादित केला. चौरंगी वाटणार्या ह्या लढाईत दुरंगी लढत झाल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले. काँग्रेसमधून शिवसेनेत केलेले पक्षांतर, सेना भाजप नेत्यांकडून अंतर्गत विरोधी काम ह्यामुळे निर्मला गावित यांना पराभव पत्करावा लागला. विजयाचे क्षण येताच हिरामण खोसकर यांच्या समर्थकांनी जोरदार विजयाचा जल्लोष केला.इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून होते. विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी केली. राष्ट्रवादी मधून इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश करून गोवर्धन गटाचे जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांनी उमेदवारी केली. प्रारंभी गावितांकडे एकतर्फी झुकणारी ही निवडणूक ऐन प्रचार काळात हिरामण खोसकर यांनी चुरशीची केली. आज नाशिकच्या शासकीय कन्या विद्यालयात झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत हिरामण खोसकर यांनी मतांची आघाडी घेतली. काँग्रेसचे हिरामण खोसकर यांना ८६५६१ मते मिळाली. निर्मला गावित यांना ५५००६ मते मिळून त्या ३१५५५ मतांनी पराभूत झाल्या. निर्मला गावित यांची तिसरी हॅटिट्रक खोसकर यांनी खंडित केली असली तरी काँग्रेसने मात्र जागा राखत हॅटिट्रक मारली. निवडणूक निर्णय अधिकारी तेजस चव्हाण यांनी हिरामण खोसकर विजयी झाल्याचे घोषित केले. यावेळी दोन्ही तालुक्यातील महाआघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
नाशिक निवडणूक निकाल : इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमध्ये अखेर परिवर्तन ; काँग्रेस आघाडीचे हिरामण खोसकर विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 3:59 PM