सातपूर : उद्योजकांना चालना मिळण्यासाठी आणि विकासासाठी ‘मेक इन नाशिक’ हा उपक्रम राबविण्याचा निमाचा निर्णय अतिशय योग्य असून, या उपक्रमाला शासनाकडून सर्वोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आता नाशिकच्या उद्योगांचे ब्रॅन्डिंग मुंबईला करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही ते म्हणाले. निमाच्या वतीने एप्रिल महिन्यात मुंबईला मेक इन इंडिया व मेक इन महाराष्ट्र च्या धर्तीवर मुंबईत ‘मेक इन नाशिक’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी शासनाकडून योग्य सहकार्य मिळावे, यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत निमात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाजन यांनी निमाने उद्योग विकासासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. जिल्हा पातळीवर प्रथमच निमाने अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या उपक्रमास शासनाच्या माध्यमातून सर्वप्रकारचे सहकार्य करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. या उक्रमाची सविस्तर माहिती निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी दिली. प्रास्ताविक निमाचे सरचिटणीस उदय खरोटे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, ज्ञानेश्वर गोपाळे, मधुकर ब्राह्मणकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
‘नाशिकच्या उद्योगांचे होणार मुंबईला ब्रॅन्डिंग’
By admin | Published: December 21, 2016 10:58 PM