निफाड : तालुक्यातील मूळचे उगाव येथील रहिवासी व सध्या मरळगोई बु. येथे वास्तव्यास असलेले भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (३२) यांचा जम्मू- काश्मीर येथे कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कुटुंबियांना फोनद्वारे मिळाली आहे. दरम्यान, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप प्रशासनापर्यंत आलेली नाही. या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवासी उत्तम बाबुराव ढोमसे यांचे ते सुपुत्र आहेत. जनार्दन यांचे प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे उगाव येथे झाले होते. बारावीनंतर जनार्दन हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले. त्याआधी त्यांनी लातूर येथे भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अकॅडमीत प्रवेश सध्या घेतला होता. सन २००६-०७मध्ये सर्वप्रथम कच्छभोज, त्रिपुरा, आसाम येथे त्यांनी सेवा बजावली तर सध्या जम्मू-काश्मीर येथे कार्यरत होते. तीन वर्षांनंतर त्यांची सेवा संपणार होती. त्यांचे वडील उत्तम बाबुराव ढोमसे व आई हिराबाई उत्तमराव ढोमसे हे शेती व्यवसायानिमित्त निफाड तालुक्यातील मरळगोई खुर्द येथे स्थलांतरित झालेले आहेत.
जनार्दन यांच्या पश्चात आई- वडील, आजी-आजोबा तसेच पत्नी रोहिणी, मुलगा पवन (वय ८). मुलगी आरू (वय २), भाऊ दिगंबर, चुलते व चुलती असा परिवार आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक प्रशासनाकडे रात्री उशिरापर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नव्हती. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने निफाड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.