नाशिक : पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या (सीओईपी अल्युमनी) नाशिक कट्ट्याचे मंगळवारी (दि.२६) प्रजासत्ताकदिनी सायंकाळी पाच वाजता उद्घाटन होणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यासाठी सीओईपी पुणे अल्यूमनी असोसिएशनचे पदाधिकारी तसेच नाशिक शहरातील सर्व माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. नाशिकमधील सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेची यासंदर्भात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अशोका स्कूलमध्ये बैठक झाली असून या बैठकीत उपस्थित असलेल्या सीओईपीच्या शंभर माजी विद्यार्थ्यांनी नाशिक कट्टा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे शहरानंतर नाशिकमध्ये सीओईपी अल्युमनीचा दुसरा कट्टा सुरू होत आहे. या नाशिक कट्टाद्वारे विविध उपक्रम राबविले जाणार असून यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, स्टार्टअप करता मदत, नाशिक शहरात पाचशे विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे कार्यक्रम देणे, आदी विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार असल्याची माहिती सीईओपीचे माजी विद्यार्थी अशोक कटारिया, प्रशांत पाटील, विजय बाविस्कर, अरविंद महापात्रा यांनी दिली आहे.