- अझहर शेखनाशिक - शहरातील गजरा बांधकाम समुहाचे चेअरमन हेमंत मदनलाल पारख (५१,रा.श्रद्धाविहार, इंदिरानगर) यांचे अज्ञात इसमांनी त्यांच्या राहत्या निहिता नावाच्या बंगल्यासमोरून शनिवारी (दि.२) रात्री दहा वाजेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्वत: घटनास्थळी धाव घेत त्यांच्या शोधात पथके रवाना केली होती. दरम्यान, रविवारी (दि.३) पहाटे पारख यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळविले आणि पोलिस व नातेवाईकांनी नवसारी गाठून पारख यांना सुखरूप ताब्यात घेत नाशिकमध्ये त्यांच्या राहत्या घरी आणले. दरम्यान, राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या घरी भेट देत पारख यांची विचारपूस केली.
शहरातील इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील श्रद्धाविहार भागात मुख्य रस्त्यापासून काही मीटर आतमध्ये कॉलनीरोडला लागून निहिता नावाचा बंगला आहे. या बंगल्यात हेमंत पारख हे त्यांच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या बंगल्यासमोरून अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांना मोटारीत बळजबरीने कोंबून पळ काढला होता. यानंतर घटनेची माहिती मिळताच रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले होते. शिंदे यांनी त्वरित पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त गुन्हे शाखेच्या तीनही युनिटचे अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या शोधार्थ वेगवेगळे पथके तयार करून त्वरित रवाना करण्याचे आदेश दिले होते. रात्रभर पोलिसांची पथके वेगवेगळ्या दिशेने अपहृत पारख यांचा शोध घेत होती.मात्र पोलिसांना कुठल्याही स्वरूपाचा सुगावा यावेळी लागू शकला नाही.
रविवारी पहाटे त्यांच्या नातेवाईकांच्या मोबाइलवर स्वत: पारख यांनी संपर्क साधून ते कोठे आहे, याची माहितील दिली. यानंतर नातेवाईकांनी इंदिरानगर पोलिसांना कळविले व त्वरित पोलिस अणि नातेवाईक त्यांनी सांगितलेल्या सुरत जिल्ह्यातील नवसारी-वलसाडकडे रवाना झाले. त्याठिकाणी त्यांनी पारख यांनी सुरक्षितपणे सोबत घेत वाहनातून नाशिकला आणले. याबाबत पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यांचे बांधकाम व्यावसायिक भागीदार अक्षय धैर्यशील देशमुख (५१,रा.श्रद्धविहार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात अज्ञात अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.