- शेखर देसाईनाशिक- व्यापारी वर्गाने लिलावात सहभाग न घेतल्यास जिल्हा उपनिबंधक यांच्या निर्देशानुसार व्यापाऱ्यांना नोटीसा देऊन आणि अनुज्ञप्ती निलंबित करण्याची तसेच व्यापारी वर्गांना बाजार समितीने दिलेल्या प्लॉट्सह विविध सुविधा परत घेण्याची कार्यवाही करण्याचा निर्णय आज लासलगाव बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला .
कांदा व्यापाऱ्यांनी बुधवार पासून लिलाव बंद केले आहेत. परंतु मार्केट सुरू राहावे अशी शेतकरी यांची मागणी आहे तर व्यापारी वर्गाची भूमिका बघता ते बंद वर ते ठाम आहेत. जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार आता व्यापाऱ्यांवर कारवाई होणार असून परवाने निलंबित करणे तसेच त्यांना दिलेले भूखंड जमा करण्याची कारवाई केली जाणार आहे. बाजार समितीत १३१ व्यापारी आहेत. या सर्वांवर जिल्हा उप निबंधक यांचे सूचनेनुसार कारवाई होणार असून २५ ते २७ व्यापारी यांनी परवाने बाजार समितीत सादर केले आहेत. तसेच बाजार समितीने ३६ व्यापाऱ्यांना भूखंड दिले आहेत, ते परत घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बाजार समिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले की, नोटिसा तयार आहेत. त्या दिल्या जाणार असून काही व्यापाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवीन परवाने मागितले तर ते लगेच देऊ असे सांगून क्षीरसागर यांनी सणासुदीच्या काळात लिलाव सुरू राहिले पाहिजे, शेतकरी प्रतिनिधी म्हणून ही आमची संचालक मंडळाची भूमिका आहे असे स्पष्ट केले.
दरम्यान, आज सलग दुसऱ्या दिवशीही व्यापारी वर्गांचा बंद सुरूच आहे. कांदा लिलाव बंद पडल्याने नाशिक जिल्ह्याचे नगदी पीक असलेल्या कांदा व्यवहाराचे खरेदी विक्री व्यवहार ठप्प झाले असून कांदा उत्पादकांचे दररोज किमान 30 ते 40 कोटी रुपयांची नाशिक जिल्ह्यात नुकसान होत आहे.