नाशिक : राज्यात सत्तेसाठी महाशिव आघाडी स्थापन होत असताना नाशिकमध्येदेखील आता याच आघाडीचा जोर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाणवि-ण्याची चिन्हे आहेत. नाशिक महापालिकेचे महापौरपद खुले झाल्याचे मुंबईत बुधवारी (दि. १३) सोडतीत स्पष्ट झाल्यानंतर आता नाशिकमध्ये महाशिव आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. तर मालेगाव महापालिकेतील शिवसेना-कॉँग्रेस हा सत्ता पॅटर्नच आता राज्यात राबविला जात असताना युती दुभंगल्यामुळे भाजपची भूमिका याठिकाणी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.नाशिक महापालिकेत १२२ पैकी ६५ नगरसेवक भाजपचे असल्यामुळे या पक्षाचे पूर्ण बहुमत आहे. परंतु विधानसभा निवडणुकीदरम्यान घडलेल्या घडामोडी आणि निकालानंतरची नवी समीकरणे याची सांगड घालण्यासाठी मात्र जुळवाजुळव केली जात आहे. सध्या महापालिकेत दोन नगरसेवकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे १२० नगरसेवकांची संख्या असून, बहुमतासाठी ६१ जणांची गरज आहे. भाजपमध्ये फाटाफूट न झाल्यास त्यांना अडचण नाही, मात्र महाशिव आघाडीशिवाय मनसे आणि अपक्ष मिळून ५५ संख्या बळ होते, त्यामुळे भाजपत फूट पडल्यास अथवा काही गैरहजर राहिल्यास भाजपला नाशिक महापालिकेतदेखील सत्तेपासून दूर ठेवणे शक्य आहे. याचप्रमाणे मालेगाव महापालिकेचे महापौरपद हे इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले असून याठिकाणी कॉँग्रेस-सेनेपुढे महापौरपद टिकवून ठेवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. युती तुटल्यामुळे आता भाजपची भूमिका निर्णायक ठरणार असून भाजपने महागठबंधनला पाठिंबा दिल्यास सत्तेची समिकरणे बदलण्याची शक्यता आहे.
नाशिकला महाशिव आघाडी; मालेगावी भाजप निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:51 AM