गेल्या दीड वर्षापूर्वी याच वाडीतून एका वृद्ध महिलेला बिबट्याने घरातूनच फरपटत नेऊन तिचाही बळी घेतला होता. ही घटना स्मरणात असतानाच बिबट्याने आणखी एका वृद्ध महिलेला फरपटत नेत तिचा बळी घेतल्याने वन विभाग खडबडून जागा झाला आहे. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याच्या वावर असलेल्या मार्गाचा अंदाज घेत बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा व ट्रॅप कॅमेरे लावण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. श्रीमती शकुंतला अमृता रेरे (५५), असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावापासून जवळच असलेल्या झोपडीवजा झापात ही महिला आपल्या शेळ्यांसह राहत होती.
रात्रीच्या सुमारास सावज शोधण्यासाठी वावरत असलेल्या बिबट्याला शेळ्यांची चाहूल लागल्याने बिबट्या या झापाकडे आला असावा व त्याच स्थितीत बिबट्याने झोपेत असलेल्या वृद्ध महिलेला फरपटत ओढत नेऊन तिचा बळी घेतला. वन विभागाला याबाबतची माहिती मिळताच इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपरिमंडल अधिकारी भाऊसाहेब राव, वनरक्षक सुरेखा गोहाडे, जाधव, गाडर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा माग घेतला. वन विभागाच्या नियमानुसार या महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आज परिसरात पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनपरिमंडल अधिकारी भाऊसाहेब राव यांनी दिली.
दीड वर्षापूर्वीही महिलेचा बळी
दीड वर्षापूर्वीही ८ ऑगस्ट २०२० रोजी चिंचलेखैरे या वाडीतीलच याच परिसरातून रात्रीच्या वेळेसच श्रीमती भोराबाई महादू आगीवले या वृद्ध महिलेलाही बिबट्याने घरातूनच जंगलात फरपटत ओढत नेऊन तिचा बळी घेतला होता. दुर्गम डोंगराळ भाग व जंगल परिसर असल्याने या भागातही नेहमीच बिबट्यांचा वावर असतो. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असते.
...तर जीव वाचू शकला असता!
सदर मृत महिला अनेक वर्षांपासून तिच्या पतीचे निधन झाल्याने जंगलातील झापावर राहत होती, तर एक किमी अंतरावर गावालगत तिच्या मुलाचे घर होते. सदर महिलेला दोन मुली व मुलगा, असा परिवार आहे. यातील थोरल्या मुलीचे लग्न झाले आहे, तर ३० वर्षांचा मुलगा व २८ वर्षांची मुलगी हे दोघे गावातल्या घरी राहत होते. सर्वांत लहान मुलगी ही वृद्ध महिलेला रोज जेवण घेऊन झापावर जात असे. दरम्यान, रात्री सदर झापेचा दरवाजा खुला राहिल्यामुळे बिबट्याने आतमध्ये प्रवेश करत डाव साधला. दरवाजा बंद असता तर सदर महिलेचा जीव वाचू शकला असता, असे गावकऱ्यांनी सांगितले.