- संजय पाठकनाशिक- तब्बल दीड महिन्याच्या घोळानंतर अखेरीस नाशिकच्या जागेचा तिढा महायुतीने सोडवला असून शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. गोडसे हे चौथ्यांदा लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असून आता त्यांचा सामना उद्धवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी रंगणार आहे. तब्बल दीड महिने नाशिकची जागा शिंदे सेना, भाजपा की राष्ट्रवादीला मिळणार या विषयावर खल सुरू होता. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आल्यानंतर स्पर्धा अधिकृत तीव्र झाली होती दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाल्यानंतरही महायुतीचा उमेदवार घोषित नसल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला होता.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राजकीय हालचाली गतिमान झाल्या काल दिवसभर भाजपाचे नेते गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून होते तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील नाशिकमध्ये येऊन बैठका घेतल्या गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ तसेच माधवगिरी महाराज यांची भेट घेऊन त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला तर बावनकुळे यांनी देखील आज छगन भुजबळ यांची भेट घेतली होती चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच नाशिकच्या जागेवरील भाजपाचा दावा आता नसल्याचे सांगून ही जागा शिवसेनेकडे राहील असे स्पष्ट केले होते.
त्यानंतर आज अपेक्षेनुसार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना शिंदे सेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होताच फटाक्यांची आतिषबाजी करून समर्थकांनी जल्लोष केला हेमंत गोडसे यांनी 2009 मध्ये प्रथम मनसेकडून राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली त्यात त्यांचा 27000 मतांनी पराभव झाला होता त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा ते निवडून आले आहेत 2014 मध्ये त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता तर 2019 मध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांचा त्यांनी पराभव केला होता आता त्यांचा सामना उद्धवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे.