- नीलेश तांबे नाशिक : बोलणारा विदेशी पोपट अशी ओळख असलेल्या एक पाळीव ‘मकाऊ’ पोपट गंजमाळ येथील एका झाडावर सुमारे ७० ते ८० फूट उंचीवर नायलॉन मांजात अडकल्याची घटना शनिवारी (दि.९) घडली होती. घटनेची माहिती मिळताच शिंगाडातलाव येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयातील जवानांनी हायड्रोलिक शिडी बाऊजर वाहनाला पाचारण करत पोपटाची सूटका केली.
जुने नाशिकमधील गंजमाळ येथील पोलीस चौकीजवळ असलेल्या एका मोठ्या डेरेदार वृक्षाच्या फांदीवर नायलॉन मांजामध्ये मकाऊ पोपट शुक्रवारी (दि.८) अडकून उलटा लटकलेला होता. मकाऊचे पालक मुजाहिद शेख यांच्या ही बाब लक्षात आली, त्यांनी शिंगाडा तलाव येथे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. पावसाचा जोर रात्री कमी झाल्याने तातडीने ‘देवदूत’ बंबासह जवान घटनास्थळी पोहचले. रात्रीचा अंधार आणि लोंबकळणाऱ्या वीजतारांमुळे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करणे श्यक्य नव्हते. यामुळे शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाचे बाऊजर बंबासह लीडिंग फायरमन किशोर पाटील, संतोष आगलावे, फायरमन अनिल गांगुर्डे, सोमनाथ थोरात, दिनेश लासुरे, उदय शिर्के, इसाक शेख, विजय चव्हाणके, बंब चालक एस.पी. देटके, महेश कदम, जयंत सांत्रस आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर उंची जास्त असल्यामुळे हायड्रोलिक शिडीचे वाहनाला पाचारण करण्यात आले. या शिडीद्वारे जवानांनी झाडाच्या फांदीपर्यंत पोहचून पोपटाला नायलॉन मांजाच्या जाळ्यातून मुक्त करत सुखरूप खाली आणून पालकाच्या स्वाधीन केले.