- संजय पाठक नाशिक- बीडमध्ये प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी भाजपाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी काल प्रीतम मुंडे या नाशिक मधून निवडणूक लढू शकतात, अशा प्रकारचे विधान केले होते. मात्र त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांनी आधी बीडमध्ये लक्ष घालावे त्यांना तिथून निवडून येणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी हे विधान केले. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नसून भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा सांगितल्यामुळे अद्याप उमेदवार निश्चित होऊ शकलेला नाही. छगन भुजबळ यांना तीन महिन्यापूर्वीच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने नाशिक मधून उमेदवारी करण्यास सांगितले होते. मात्र उमेदवारी घोषित न झाल्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीच उमेदवाराच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे.
दुसरीकडे बीडमधून प्रीतम मुंडे ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांनी काल अर्ज दाखल करताना घेतलेल्या सभेत प्रीतम मुंडे नाशिक मधून निवडणूक लढू शकतील असे विधान केले होते. या संदर्भात छगन भुजबळ यांनी मात्र वेगळे मत व्यक्त केले. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष घालावे त्यांची केंद्रात गरज आहे असे ते म्हणाले. नाशिकमध्ये भाजपाकडे वंजारी समाजाचे अनेक दावेदार असून त्यात हेमंत धात्रक, बाळासाहेब सानप, शिंदे सेनेचे उदय सांगळे अशी अनेक नावे असल्याचे ते म्हणाले.