थंडीमुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरवा वाटाणा तसेच गाजराची आवक वाढली आहे. पंधरवड्यापूर्वी शंभर रु पये प्रतिकिलो असा दर गाठणाऱ्या वाटाण्याचे दर ३५ रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. इतर भाजीपाल्याची आवकही जास्त असल्याने भाजीपाल्याचे भाव कोसळले आहेत. हिवाळ्यामुळे वाटाणा तसेच गाजराला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
ग्राहकांना किरकोळ बाजारात वाटाणा ३५ रु पये तर गाजर १५ रुपये किलो दराने विक्र ी होत आहे. टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्यप्रदेश, इंदूर आणि ग्वाल्हेर येथून मोठ्या प्रमाणात हिरवा वाटाणा विक्रीसाठी दाखल होत असल्याचे बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी सांगितले. लासलगाव बाजारात कांद्याचे भाव कमी झाले असून लाल कांद्याला हजार रुपये तर उन्हाळी कांद्याला ३०० रुपये भाव मिळत आहे.