- धनंजय रिसोडकर
नाशिक : शिवसेनेच्या वर्धापन दिनाबद्दल उद्धव ठाकरे यांना मी काय शुभेच्छा देणार. त्यांचेच आमदार, खासदार त्यांचा पक्ष सोडून त्यांना शुभेच्छा देत आहेत. मनिषा कायंदे यांच्यानंतर अजूनही काही झटके त्यांना बसणार असून भविष्यातही अजून आमदार, खासदार फुटून मोठे झटके बसतील. त्यांच्याकडे केवळ सकाळचा भोंगा उरेल, अशा खोचक शब्दात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.
मोदींच्या ९ वर्ष कार्यकाळपूर्तीनिमित्त व्यापारी मेळाव्याला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महाजन यांनी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरुच असून दोन पक्ष असल्यामुळे विचार-विनिमयात काहीसा वेळ लागत असल्याचे सांगितले. मात्र, दोन्ही पक्षांना मंत्रीमंडळात कोण ठेवायचे, कुणाला काढायचे हे ठरविण्याचा अधिकार असून त्यात एकमेकांच्या अधिकारात कुठेही ढवळाढवळ केली जात नाही. आता बहुतांश बाबी सुरळीत झाल्या असून लवकरच मंत्रीमंडळ विस्तार केला जाणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले. मात्र, पालकमंत्री बदलाबाबत कोणतीही कल्पना नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
जलजीवन मिशन कामांमध्ये काही भ्रष्टाचार असल्यास त्याबाबत संबंधितांनी ढोबळ तक्रार न करता कुठल्या गावात, तालुक्यात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केल्यास जिल्हा परिषदेच्या सीईओ, जिल्हाधिकारी त्यात लक्ष घालतील असे महाजन म्हणाले. तसेच राज्यात कुठेही बोगस बियाण्यांबाबत निदर्शनास आल्यास शेतकरी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी दक्ष राहून तक्रार नोंदवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.