लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : नाशिक - मुंबई महामार्गाची कामे अत्यंत संथगतीने सुरू असून, झिगझॅग चालावे लागते. अनेकदा खड्ड्यांमुळे ट्रेलर अडकतात. भिवंडी बायपासचे कामही सुमार दर्जाचे आहे. प्रवास करताना हाडे खिळखिळी होत आहेत. मलाही त्याचा त्रास झाला. मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी काही हजार कोटी रुपये खर्च करून रस्ता काँक्रिटीकरण करणार असल्याचे सांगितले हेाते ते काम नंतर करा, आधी खड्डे तर बुजवा, अशी व्यथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
नाशिकमध्ये शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही व्यथा मांडली. मुंबई-आग्रा महामार्ग अत्यंत जुना असून, त्यावर नाशिकची वाहतूक चालत नाही, तर आग्र्यापर्यंतची वाहतूक चालते. या महामार्गाच्या अवस्थेमुळे नाशिकचे नाव बदनाम होत असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले की, मुळातच पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात पूल, भुयारी मार्ग अशी कामे व्हायला हवी हाती ती झाली नाहीत.
आता रस्त्यावर खड्डे आहेत, रस्ते झिगझॅग आहेत तसेच रस्ते समतल न केल्याने चढ-उतार अधिक आहे. त्यामुळे वेळ खूप लागतो. इंधन लागते आणि हाडं खिळखिळी होतात, असे सांगून भुजबळ म्हणाले की, रस्ते विकास महामंडळाचे काम सर्वाधिक संथ आणि सुमार आहे. आता त्यात मंत्री दादा भुसे यांनी लक्ष घातले आहे. या मार्गाचे सहापदरीकरण करून रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही वर्षांपूर्वी घोषणा केली होती; मात्र सिमेंटचे रस्ते नंतर करा, आधी खड्डे बुजवा म्हणजे मुंबईला तीन-साडेतीन तासांत पोहोचलो तरी चालेल; परंतु दहा तास सध्या लागणारा वेळ नको आहे, असे ते म्हणाले.