नाशिक- कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार नसलेल्या महापालिकेच्या मिळकतीतील उपक्रम बंद करणार नसल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगून चोवीस तास उलटले परंतु त्यांसदर्भातील आदेश तळापर्यंत झिरपलेले नाहीत. सिडको पाठोपाठ पंचवटीतही श्री स्वामी समर्थांचे मंदिर सील बंद करण्यासाठी कर्मचारी पोहोचले परंतु स्थानिक नगरसेवकाने केलेला विरोध आणि त्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी आयुक्तांचे आदेश असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कर्मचारी माघारी परतले आणि कारवाई टळली.
महापालिकेच्या मिळकतींचा दुरूपयोग होत असल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल आहेत. त्या आधारे महापालिकेच्या वतीने गेल्या सुमारे आठवडाभरापासून मिळकती सील करण्याचा सपाटा सुरू आहे.
अभ्यासिका, व्यायामशाळा, वाचनालये, क्रीडा संकुले याबरोबरच मोकळ्या जागेतील ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र, हास्य क्लब, योगा केंद्र तसेच अन्य मिळकती सील करण्यात आल्या आहेत. परंतु सिडकोतील खुटवडनगर येथील मोगल नगरातील श्री स्वामी सेवा केंद्र भाविकांना बाहेर काढून सिल करण्यात आले. यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरूवारी (दि.९) ज्या मिळकतीचा कोणत्याही शुल्काशिवाय वापर होत असेल तर अशा मिळकती सील करणार नाही आणि सील केले असेल तर ते काढून घेतले जाईल असे स्पष्ट केले आहे तरीही शुक्रवारी (दि. १०) पंचवटीत लोकसहकार नगर येथील श्री स्वामी सेवा केंद्र सील करण्यासाठी कर्मचारी गेले होते.