नाशिक- गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या नाशिक महापालिकेच्या सीटी लींक म्हणजेच शहर बस सेवेला येत्या ८ जुलैस डबल बेल मिळणार असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभाचा सोहळा हेाणार आहे.
महापौर सतीश कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, आमदार ॲड. राहूल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गिते, शहराध्यक्ष गिरीश पालवे, तसेच प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने यांनी शनिवारी (दि.३) मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या उपस्थितीत बस सेवेचा शुभारंभ करण्याचे निश्चीत केले. यावेळी भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेत सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.
तब्बल सहा वेळा फेटाळलेला शहर बस सेवेचा प्रस्ताव २०१८ मध्ये नाशिक महापालिकेने स्विकारला. शहरात सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी अशाप्रकारचा निर्णय घेताना राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता आल्याने हा निर्णय झाला. त्यानंतर हायटेक बस, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांना सुविधा, आयटीएमएस सुविधा तसेच पर्यावरण स्नेही इंधन असे या बस सेवेचे स्वरूप आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेने बस सेवा १ ते १० जुलैस सुरू करण्याचे ठरवल्यानंतर याच आठवड्यात दोन दिवस प्रत्यक्ष बस रस्त्यावर आणून चाचणी केली हेाती. सुरूवातीला पन्नास मिडी डिझेल बस सुरू करण्यात येणार आहेत. पंचवटी येथील तपोवन आणि नाशिकरोड येथील डेपोतून या बस धावतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बसची संख्या वाढवण्यात येणार आहे.