नाशिक - नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भाजपाचे शहराध्यक्ष आणि पूर्व नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप यांना दणका दिला आहे. 2001 पासून महापालिकेच्या मिळकतीचा विनापरवानगी वापर केल्याबद्दल 9 लाख रुपयांच्या भरपाईची नोटीस बजावली आहे.
नाशिक शहरातील पंचवटी भागातील गणेशवाडी येथे वाघाडी नदीच्या काठी महापालिकेची विद्याभवन इमारत असून यात संत ज्ञानेश्वर अभ्यासिका आणि अन्य उपक्रम चालविले जातात. या संदर्भात सचिन दप्तरे या सामाजिक कार्यकर्त्याने नदी बुजवून झालेले बांधकाम, इमारतीचा बेकायदा व्यवसायिक वापर यासह अनेक तक्रारी करून मनपा दखल घेत नसल्याने न्यायालयात धाव घेतली होती. त्या आधारे मुंढे यांनी ही कारवाई करून 2001 पासून बेकायदेशीर वापर म्हणजे महापालिकेला कोणत्याही प्रकारचे भाडे न भरता वापर सुरू असल्याने ही नोटीस काढली आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब सानप यांच्याकडे इमारतीचा करारनामा असला त्यावर कोणत्याही प्रकारची तारीख नाही. मनपाच्या अशा अनेक इमारती राजकीय मंडळी आणि नगरसेवकांनी बळकावल्या आहेत.