नाशिक : महापालिकेतील रिक्त पदांना भरतीस शासनाने हिरवा कंदील दर्शविल्यानंतर या भरतीसाठी शासनानेच ठरवून दिलेल्या टाटा इन्स्टिट्यूट कंपनीसोबत नोकर भरतीच्या कच्चा कराराला महापालिका आयुक्तांनी अंतिम मान्यता दिली असून, सामंजस्य कराराची प्रक्रिया पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास येणाऱ्या तीन वर्षाच्या काळात महापालिकेत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मनपाने नोकर भरतीसाठी आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थांची नियुक्ती केली. त्यासंदभातील शासनाचा निर्णय महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी या दोन्ही संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी आयबीपीएस या संस्थेकडून महापालिकेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून टीसीएसशी संपर्क साधण्यात आला होता. टीसीएसने नोकर भरतीसाठी होकार दर्शविल्यानंतर त्यासाठी नियमावली ठरविण्यात आली.
महापालिकेने त्यात काही बदल सुचविल्यानंतर कंपनीने कच्चा कराराचा मसुदा गेल्या आठवड्यात महापालिकेकडे पाठविला होता. त्याचा अभ्यास करून महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या कच्चा कराराला मान्यता दिली आहे. हा कच्चा मसुदा पुन्हा टीसीएसकडे पाठविण्यात आला असून, येत्या आठवडाभरात अंतिम सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होतील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"