नाशिक - डाग लागणे खरे तर तर चांगले नाही परंतु एका डिटेर्जंट पावडरच्या जाहिरातीत डाग अच्छे असल्याचे सांगितले जाते. नाशिक महापालिकेच्या महासभेत गेल्या शनिवारी झालेला गोंधळ देखील याच सदरत मोडणारा आहे. गेल्या वर्षभरापासून तत्कलीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सत्तारूढ आणि विरोधी पक्षांची मिलीजुली होती आणि आता किमान हे साटेलोटं आता नाही हे जर आता दिसत असेल तर नाशिककरांच्या दृष्टीने ते सुचिन्हच मानले पाहिजे.
कोणत्याही संस्थेत विरोधक हे असलेच पाहिजे त्यामुळे सत्तारूढ गटावर अंकुश राहू शकतो नाशिक महापालिकेसारख्या ठिकाणी जेथे भाजपाला पाशवी बहुमत आहे, अशा ठिंकाणी भाजपाने मनमानी करू नये यासाठी विरोधकांची जी काही संख्या आहे ती देखील भरपुर आहे. परंतु गेल्या वर्षभरात महापलिकेत विरोधी पक्ष असल्याचे मात्र फार कमी जाणवले. महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे रूजु झाल्यानंतर त्या अडचणी भाजपाला जाणवल्या त्याच विरोधी पक्षांतील नगरसेवकांनी जाणवत असल्या तरी त्यामुळे मुंढे यांच्यावर टीका करणारे विरोधक आणि सत्ताधारी एकच अशी स्थिती होती.
सत्तारूढ पक्षाला काही तरी करायचे आहे परंतु त्यात तुकाराम मुंढे यांचा अडसर आला आणि भाजपाची अडचण झाली की, विरोधकांनी टीका करायची आणि या टीकेचे सत्तारूढ भाजपाने वरीष्ठांकडे गा-हाण मांडायचे असाप्रकार होत असल्याचे अनेक प्रकरणात दिसत होते. राज्यात सत्ता भाजपाची आणि महापालिकेत देखील हाच पक्ष सत्तेवर अशावेळी शासनाने नियुक्त केलेले आयुक्त अडसर आणतात हे म्हणणे चुकीचे असल्याची टिका विरोधकांनी करायची आणि याच्या आधारे सत्ताधारी भाजपाने पालकमंत्री गिरीश महाजन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी करायच्या अशाप्रकारचे प्रकारचे स्क्रीप्टेड काम सुरू असल्याच्या चर्चा होत होत्या. काहीवेळा मुंढे यांच्या अडवणूक असल्याने खरोखरच विरोधकही वैतागत असल्याचे अपवादात्मक प्रसंग सोडले तर सर्वांचा मुंढे यांना विरोध असल्याने सत्तारूढ आणि विरोधकांचा एककलमी कार्यक्रम होता.
आता मुंढे यांची बदली झाल्यानंतर सत्तारूढ आणि विरोधकांचा किमान सहमती कार्यक्रम संपुष्टात आला आहे. शनिवारी झालेल्या महासभेत महापालिकेने बस सेवेसाठी आधी परिवहन सेवेचा ठराव केला आणि प्रशासनाला बस कंपनी गठीत करण्याचा ठराव पाठविला. बस सेवेला विरोधकांचा असलेला विरोधही नोंदविला नाही या प्रकारामुळे विरोधक आक्रमक झाले आणि राष्टÑवादी कॉँग्रेसच गटनेते गजनान शेलार यांनी तर पीठासनावर जाऊन गोंधळ घातला. त्यामुळे महासभेचे कामकाज महापौरांनी गुंडाळले. यापूर्वी विरोधकांच्या हातून साप मारून घेण्याचे प्रकार या गोंधळामुळे आता थांबल्याचे जाणवले आणि विरोधकांत खरा विरोध शिल्लक असल्याचे देखील आता दिसून आले.विरोधकांना खरोखरीच आपल्या जबाबदारीची जाणिव झाली असेल तर कालचा गोंधळ बराच होता असे म्हणणे गैर ठरणार नाही.