नाशिक - पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ६ मधील मखमलाबाद शिवारात मनपाच्याच मालकीच्या जागेत जलकुंभ उभारण्यास लगतच्या जागामालकाने विरोध दर्शविल्याने अखेर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने जलकुंभ उभारण्यासाठी थेट पोलिस संरक्षणाची मागणी म्हसरूळ पोलिस ठाण्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.मखमलाबाद शिवारातील सर्व्हे क्रमांक १३७/१/३ या महापालिकेच्या मालकीच्या जागेत जलकुंभ बांधण्याचे काम मंजूर झालेले आहे. सदर कामाचे कार्यादेशही मक्तेदारास देण्यात आलेले आहे. जागेवर २० दसलक्षलिटर्स क्षमतेचा जलकुंभ बांधण्याचे प्रस्तावित आहे. परंतु, सदर जागेवर बांधकामासाठी मक्तेदार गेले असता लगतचे जागा मालक शिवाजी तिडके व अन्य लोकांनी त्यास विरोध दर्शविला. सदर जागेचा ७/१२ हा मनपाच्या नावे आहे शिवाय, जागेच्या ६ ड च्या नोंदणीनुसार ०.४१ हेक्टर क्षेत्र प्रथम ग्रामपंचायत, मखमलाबाद यांच्याकडे हस्तांतर होऊन तद्नंतर महापालिकेकडे वर्ग झालेली आहे. त्यामुळे जागेवर मनपाचा मालकी हक्क आहे. मात्र, सदर जागेवर जलकुंभ उभारण्यास लगतच्या जागामालकाने तिव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे बांधकाम खोळंबले आहे. जलकुंभ मंजूर होऊनही केवळ विरोधामुळे काम रखडल्याने महासभा आणि स्थायी समितीतही स्थानिक नगरसेवकांनी त्याबाबत आवाज उठविलेला आहे. स्थायी समितीत तर सभापतींनी पाणीपुरवठा विभागाला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पाणीपुरवठा विभागाने अखेर जलकुंभ उभारण्यासाठी दि. १० जानेवारी ते १० फेबु्रवारी या महिनाभराच्या कालावधीसाठी म्हसरुळ पोलीस ठाण्याकडे पोलीस संरक्षण मागितले आहे. पोलिस संरक्षणात एखाद्या वास्तूचे बांधकाम होण्याची ही महापालिकेच्या इतिहासात पहिलीच घटना ठरण्याची शक्यता आहे.
जलकुंभ उभारण्यासाठी नाशिक महापालिकेला मागावे लागते पोलिस संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 8:10 PM
मनपाचे पोलिसांना पत्र : प्रभाग ६ मधील जलकुंभाचे काम
ठळक मुद्देपंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक ६ मधील मखमलाबाद शिवारात मनपाच्याच मालकीच्या जागेत जलकुंभसदर जागेवर जलकुंभ उभारण्यास लगतच्या जागामालकाने तिव्र विरोध दर्शविला