नाशिक : मुले होण्यासाठी आपल्या शेतातील आंबे उपयुक्त असल्याचा कथित दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना सांगली येथील त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अखेर महापालिकेने नोटीस बजावली असून, आठ दिवसांत यासंदर्भात खुलासा करण्यास सांगितले आहे. पीसीपीएनबीटी कायद्यासंदर्भात स्थापित समितीने सोमवारी यासंदर्भातील व्हिडीओ क्लीप बघितली त्यानंतर ही नोटीस बजावली आहे. नाशिकमध्ये १० जून रोजी संभाजी भिडे गुरुजी यांची रविवार पेठेतील वडांगळीकर मठात बैठक झाली. यावेळी खडा पहारा योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत बोलताना भिडे यांनी आपल्या शेतातील आंबे खाल्ल्यास मुलेच होतात असा दीडशे जणांचा अनुभव असल्याचा दावा केला होता, अशी तक्रार गणेश बोराटे यांनी आरोग्य सहसंचालकांकडे केली होती. त्यांनी यासंदर्भात नाशिक महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ही सभा झाल्याने महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय अधिकाºयांना यासंदर्भात सत्यता पडताळण्यासाठी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महापालिकेला भिडे गुरुजींचा पत्ताच माहिती नसल्याने अडचण निर्माण झाली होती, परंतु तक्रारदार बोराटे यांनीच यासंदर्भात पत्ता उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या गर्भजल चिकित्सा प्रतिबंधात्मक समितीची बैठक सोमवारी (दि. १८) संपन्न झाली. यावेळी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व चिकित्सा प्रतिबंधक कायद्यान्वये ही नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भिडे यांनी केलेल्या विधानाबाबत ही नोटीस बजावून आठ दिवसांत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. सायंकाळी स्पीडपोस्टने ही नोटीस रवाना करण्यात आली.
भिडे गुरुजींना नाशिक महापालिकेची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:50 AM