नाशिक : जनावरांना होणाऱ्या लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर शहरातील म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करणारे कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.
राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वेगाने होत असून जिल्ह्यात ८२ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने महाराष्ट्र राज्य लम्पी चर्मरोग आजाराकरिता नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार जनावरांची वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील म्हैसवर्गीय जनावरांची कत्तलखाने पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मनपा डॉ. पुलकुंडवार यांनी दिले आहेत.
नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महात्मा फुले मार्केट आणि भद्रकाली येथील कत्तलखान्यामध्ये म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल केली जाते, ती पुढील सूचना येईपर्यंत बंद करावी असे आदेशात म्हटले आहे. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या नाशिक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने महानगरपालिकेला कत्तलखाने बंद ठेवण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलली आहेत.