नाशिक- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ व २६ मधील दोन जागांच्या पोटनिवडणूकीसाठी आज शांततेत मतदान झाले. सायंकाळी सहा वाजे पर्यंत प्रभाग क्रमांक २२ मध्ये सुमारे तीस टक्के तर प्रभाग क्रमांक २६ मध्ये सुमारे ३५ टक्के मतदान झाले. या दोन्ही प्रभागांसाठी उद्या मतमोजणी होणार आहे.
महापालिकेतील आगामी स्थायी समितीसह अन्य समित्यांच्या सत्तेसाठी राजकिय दृष्टया दोन्ही पोटनिवडणूक महात्वाच्या होत्या. सकाळ पासूनच मतदानासाठी मतदारांचा प्रतिसाद संथ होता. दुपारनंतर काही प्रमाणात मतदारांची संख्या वाढली. काही मतदान केंद्रांवर रांगाही लागल्या होत्या. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. दोन्ही प्रभागात सुमारे ३० ते ३५ टक्के सरासरी मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या निवडणूकीत प्रभाग क्रमांक २२ मधुन राष्टÑवादीकडून जगदीश पवार, भाजपकडून डॉ. विशाखा शिरसाट, भाजप बंडखोर रामदास सदाफुले, कॉंग्रेस बंडखोर सारीका तीर यांच्यात प्रमुख लढत आहे. तर प्रभाग क्रमांक २६ मधून मनसेचे दिलीप दातीर, शिवसेनेचे मधूकर जाधव, भाजपचे कैलास आहिरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहन जाधव यांच्यात प्रामुख्याने लढत आहे.
नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक २२ मधील भाजप नगरसेविका सरोज आहिरे यांनी विधानसभा निवडणूकीसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी राष्टÑवादीकडून निवडणूक लढविली होती. तर सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २६ मधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनीही राजीनामा देऊन मनसेकडून निवडणूक लढविली त्यामुळे या दोन रिक्त जागांसाठी आज पोटनिवडणूक होत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी असली तरी मतदारांचा मात्र जेमतेम प्रतिसाद आहे. नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ मध्ये सकाळी पहिल्या दोन तासात अवघे ३.६ टक्के मतदान झाले होते तर सिडकोतील ही सुमारे चार टक्के मतदान झाल होते.