नाशिक : सिंहस्थ काळात ४६५ कोटींचे रस्ते, मनसेच्या सत्ताकाळात १९२ कोटींचे रस्ते, आता भाजपाच्या सत्ताकाळात २५७ कोटींचे रस्ते, परवा स्थायी समितीच्या बैठकीत ३७ कोटींच्या रस्ते दुरुस्तीला मंजुरी... महापालिकेला गेल्या दोन वर्षांत केवळ रस्ते विकासाने पछाडले असून, आता नगरसेवक निधीतूनही रस्त्यांवर १९ कोटी रुपये खर्ची घालण्यात येत आहेत. पालिकेला लागलेले रस्ते विकासाचे हे वेड आता सत्ताधारी भाजपात संघर्षाचे कारण बनू लागले आहे.महापालिकेत भाजपाने बहुमताने सत्ता संपादन केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाच्या विकासासाठी ७५ लाखांचा निधी घोषित केला. या निधीबाबत आधी आढेवेढे घेणा-या आयुक्तांनीही नंतर हात मोकळा ठेवला. गेल्या दोन वर्षांत रस्ते विकासावर साडेसहाशे कोटी रुपये खर्ची पडले असताना सत्ताधारी भाजपाच्या काळात पुन्हा २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासाचा घाट घातला गेला. रस्त्यांवरच कोट्यवधी रुपये खर्ची पडत असताना नगरसेवकांनी आपल्या प्रभागात रस्तेवगळता अन्य कामांना प्राधान्य देणे अपेक्षित होते. परंतु, आतापर्यंत खर्च झालेल्या नगरसेवक निधीतून सुमारे १९ कोटी रुपये केवळ रस्ते विकासावर खर्ची पडले आहेत. रस्ते दुरुस्तीवरही १ कोटी ४० लाख रुपये खर्च झाले आहेत. नगरसेवक निधीतील ९४ कोटींपैकी ८५ कोटी ३४ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता मिळून त्यांची कार्यवाही सुरू आहे. रस्त्यापाठोपाठ नगरसेवकांनी पथदीप विद्युतीकरणाचे प्रस्ताव दिले असून, त्यावर १२ कोटी ९२ लाख रुपये खर्ची पडले आहेत. काही नगरसेवकांनी आपल्या निधीतून पुतळे उभारणे, पुतळे दुरुस्ती या कामांचेही प्रस्ताव दाखल केलेले आहेत. नगरसेवक निधीतून सर्वाधिक खर्च हा रस्ते विकासावरच होत असल्याने त्यामागचे अर्थकारण मात्र चर्चेत आले आहे. त्यातूनच सत्ताधारी भाजपात अंतर्गत संघर्ष निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.मोजक्या नगरसेवकांच्या जाणिवा जागृतकाही मोजक्याच नगरसेवकांनी मूलभूत सोयीसुविधांवर भर दिलेला आहे. त्यात प्रामुख्याने, स्मशान बांधणे व पूरक साहित्य खरेदीसाठी ४ लाख ९६ हजार तर स्मशान दुरुस्तीवर १८ लाख २८ हजार रुपये खर्ची पडले आहेत. काहींनी शौचालये, मुता-या बांधणे, वृक्ष संरक्षक जाळ्या खरेदी, शाळांना संगणक पुरवणे, गटारी बांधणे, मलवाहिका दुरुस्ती, खुल्या जागांचे संरक्षण या कामांना प्राधान्य देत आपल्यातील जनतेप्रती असलेल्या जाणिवा जागृत ठेवल्या आहेत. .
नाशिक महापालिकेला लागले रस्ते विकासाचे वेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 8:18 PM
कोट्यवधींचा खर्च : नगरसेवक निधीतूनही १९ कोटींचे रस्ते
ठळक मुद्देरस्ते विकासाचे हे वेड आता सत्ताधारी भाजपात संघर्षाचे कारण नगरसेवक निधीतील ९४ कोटींपैकी ८५ कोटी ३४ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता