नाशिक- नाशिक महापालिकेचे सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे 2 हजार 161 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज स्थायी समितीला सादर केले. या अंदाज पत्रकात कोणतीही करवाढ सूचविण्यात आली नसली तरी पाणी पुरवठ्याचा खर्च वसूल करण्यासाठी उपभोक्ता आकार लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
नाशिक महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांना सदरचे अंदाजपत्रक आयुक्तांनी सादर केले. या अंदाजपत्रकात जुन्या कामांचे 965 कोटी रुपयांचे दायित्व आहे. आयुक्तांनी नगरसेवक निधी अंतर्गत 12 कोटी रुपयांची तरतूद केली असून प्रत्येक नगरसेवकाला या अंतर्गत 9 लाख 44 हजार रुपये स्वेच्छा निधी मिळणार आहे तर यंदा प्रथमच प्रभाग विकास निधीची तरतूद करण्यात आली असून 38 कोटी 10 लाख रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली असल्याने प्रत्येक नगरसेवकाला 30 लाख रुपयांचा विकास निधी कामे करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. नाशिक शहरात लवकरच बस सेवा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी देखील तरतूद करण्यात आली आहे. तर शिवाजी उद्यानाचे नूतनीकरण करण्याबरोबरच सिडकोत 34 कोटी रुपये खर्च करून सेंट्रल गार्डन विकसित करण्यात येणार आहे. नाशिकरोड, पंचवटी, गंगापूर रोड येथे लवकरच नाट्यगृह बांधण्यात येणार आहे.