नाशिक : दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी नाशिक महापालिकेने पुढाकार घेतला असून नाशिकमध्ये मुंबई नाका येथे दिव्यांग भवन सुरू होणार आहे. नाशिक महापालिका यासाठी पुढाकार घेत असले तरी या भवनाचा उपयोग केवळ तालुक्यापुरता नव्हे तर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनादेखील हेाणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिव्यांगांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्यांची होणारी फरपट थांबावी म्हणून दिव्यांग भवन असावे अशी अनेक दिवसांपासून मागणी असून बच्चू कडू देखील याबाबत आग्रही होते. परंतु दिव्यांगांच्या योजना अनेक विभागांमध्ये असल्याने यासाठी समन्वय आणि निधीचा प्रश्न असल्याने या संदर्भातील निर्णय होऊ शकलेला नव्हता. परंतु दिव्यांग विभाग राज्यात सुरू झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेला दिव्यांग निधी हा अखर्चित राहिला तर तो इतर विभागासाठी वापरू नये असा निर्णय झाल्याने या योजनांचा निधी कायम राहिला.
नाशिक महापालिका ही राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी महापालिका असल्याने महापालिकेकडे दिव्यांगांसाठीचा कोट्यवधींचा निधी असतो. त्यातील सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून मुंबई नाका येथे दिव्यांग भवनाची जागा निश्चित करण्यात आली असून या ठिकाणी दिव्यांगांना सर्व प्रकारच्या सोयी-सवलती आणि सुविधांची माहिती दिव्यांगांना मिळणार आहे. ज्या ज्या शासकीय विभागांमध्ये दिव्यांगांसाठीच्या योजनांचे कामकाज चालते त्या सर्व योजना एकाच ठिकाणी सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहाणार आहे. त्यामुळे दिव्यांगांसाठीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांना दिलासा देणारा ठरणार आहे.
मालेगाव मनपाची ५० लाखांची तरतूद
नाशिक महापालिकेनंतर मालेगाव महापालिकेनेदेखील मालेगावमध्ये दिव्यांग भवन उभारण्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. यामध्ये आणखी वेळोवेळी दिव्यांग निधीतून पुन्हा वाढ करण्यात येणार असून मालेगाव शहर आणि तालुक्यासाठी या भवनाचा उपयोग होणार आहे.