नाशिक : जर्मन सरकार आणि भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून नाशिक शहरामध्ये कचºयापासून कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. २९) दुपारी १२ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या पथदर्शी प्रकल्पातून महापालिकेला दरमहा एक लाख युनिट इतकी वीज पुढील दहा वर्षांपर्यंत उपलब्ध होणार असून, सदर प्रकल्प चालविण्याकरिता मनपा संबंधित मक्तेदाराला दरमहा पाच लाख रुपये मोजणार आहे. आंतरराष्टÑीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत सदर प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यासाठी जी.आय.झेड. जर्मनी यांच्याकडून तांत्रिक व आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. सदर प्रकल्पात दररोज सुमारे १५ ते २० मे. टन ओला कचरा व १० ते १५ मे. टन सार्वजनिक शौचालयातील मलजल अशा ३० मे. टन कचºयावर प्रक्रि या करून बायोगॅस / मिथेन गॅस तयार करून त्याद्वारे वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. आठ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी जी.आय.झेड. जर्मनी यांच्याकडून नाशिक महानगरपालिकेस ६.८० कोटी रुपये इतके अनुदान प्राप्त झाले असून, प्रकल्प उभारणीसाठी लागणारा १.२२ कोटी रुपये खर्च कंपनी करीत आहे. यात मनपाची कोणतीही भांडवली गुंतवणूक नाही; मात्र प्रकल्प उभारणीकरिता सुमारे सहा हजार चौ. मीटर जागा मनपा खत प्रकल्पाशेजारी मनपाने उपलब्ध करून दिलेली आहे. या प्रकल्प उभारणीचे काम मे. विल्होळी वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि., बंगळुरू यांच्यामार्फत करण्यात आले आहे. दहा वर्षे कालावधीसाठी संपूर्ण प्रकल्प चालविणे, देखभाल व दुरु स्तीचे काम सदर कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पासाठी लागणारा ओला कचरा (हॉटेल वेस्ट व भाजीपाला वेस्ट) व मलजल वाहतुकीची जबाबदारीसुद्धा कंपनीची असणार आहे. संबंधित कंपनी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून तयार होणाºया विजेतून महानगरपालिकेस वीज पुरविणार आहे. पॉवर ग्रीडला जोडणी प्रकल्पात तयार झालेली वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पॉवर ग्रीडला जोडण्यात येणार असून, जेवढी वीज पॉवर ग्रीडमध्ये टाकण्यात येईल तेवढे युनिट मनपास इतर वीज देयकातून सूट मिळणार आहे.
नाशिक मनपाला मिळणार दरमहा एक लाख युनिट वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:55 PM