शहरात दोन दिवसांपूर्वी वोक्हार्ट खासगी रुग्णालयांत दीड लाख रुपयांच्या अनामत रक्कम मिळण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भाभे यांनी रुग्णाच्या नातेवाईकासमवेत आंदोलन केल्याने हा विषय गाजत असून, त्या पार्श्वभूमीवर रामायण बंगल्यावर महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे व भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी मुख्यलेखा परीक्षक बी. जी. सोनकांबळे यांच्यासमवेत बैठक घेतली. वोक्हार्ट रुग्णालयाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणात मुख्यलेखा परीक्षकांना लक्ष घालण्यास सांगण्यात आले. शहरातील कोणत्याही रुग्णालयात अनियमितता आढळल्यास कारवाई करण्याचे आदेशदेखील देण्यात आले.
कोरोनाबाधितांवर उपचारसाठी अनेक खासगी रुग्णालय चांगली सेवा देत आहेत. मात्र काही मेाजक्या रुग्णालयातील बिल आकारणीत गोंधळ असल्याच्या तक्रारी आहेत, त्यांच्यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी लेखापरीक्षकांवर नियंत्रणासाठी शासनाच्या लेखापरीक्षण विभागाकडून बारा अधिकारी नियुक्त करून घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या मुख्यलेखापरीक्षकांच्या अध्यक्षतेखालीदेखील एक समिती नियुक्त करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
इन्फो..
महापौर हेल्पलाइन सुरू करणार
रुग्णालयाबाबतील तक्रारी तसेच अन्य काही तक्रारी आणि शंका निरसनासाठी महापौरांच्या वतीने हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यावर तक्रारी कराव्यात, असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे. महापौरांचे निवासस्थान असलेल्या रामायण याठिकाणी हेल्पलाइन सेंटर सुरू करण्यात येणार आहे.