नाशिक- पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने वर्षभरासाठी विविध उप्रकमांचे नियोजन करण्यात आले असून पाच एकराच्या रोप वाटीकेत आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून देशी प्रजातीची रोपे तयार करण्यात येणार असून पुढिल वर्षी ती लोकसहभागातून लावली जाणार आहे.
वृक्षतोडीमुळे नेहमीच वादात सापडलेला महापालिकाचा उद्यान विभाग आता चांगलाच सक्रीय झाला आहे. अभिनेते आणि सह्याद्री देवराईकार सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमच्या मदतीने विविध योजना आखल्या जात आहेत. शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातील वृक्ष प्रेमी संस्थांची बैठक देखील घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच उपआयुक्त (उद्यान) शिवाजी आमले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.नाशिक शहरात महापालिकेच्या वतीने देवराई संकल्पनेतून मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात येत आहेत. परंतु त्यापुढे जाऊन महापालिकेने देशी प्रजातीच्या झाडांसाठी रोपवाटिका तयार करण्याचा विचार पुढे आला. महापालिकेच्या मालकीची पाच एकर जागा रोपवाटिकेसाठी उपलब्ध असून खासगी वृक्षप्रेमी संस्था पुढे आल्यास त्यांच्या माध्यमातून विकास करण्याची तयारी महापलिकेने दिली. त्यावर आर्ट आॅफ लिव्हींगने त्याची जबाबदारी स्विकारली आहे. एक लाखझाडे पुुढिल वर्षी लावण्यात येईल, असे यावेळी ठरविण्यात आले.
महापालिकेच्या वतीने लोकसहभागातून वृक्ष लावण्यात येणार असून त्यासाठी नागरीकांनी रोपे मागितल्यास ती विनामुल्य दिली जातील. तसेच लोकहभागातून सीड बॅँकेचा देखील विचार पुढे आला आहे. नागरीकांनी त्यांच्याकडील बिया आणून द्यायच्या आणि त्या बदल्यात दुसऱ्या बि- बियाणे घेऊन जावेत अशाप्रकारचे नियोजन करण्यात आले आहे.