नाशिक - ‘स्मार्ट सिटीची घाई, गरीबांच्या पोटावर पाय देई’, ‘ग्राहक तेथे हॉकर्स झोन झालेच पाहिजेत’ अशा घोषणा देत हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या माध्यमातून शहरातील फेरीवाल्यांनी शुक्रवारी (दि.२३) महापालिका मुख्यालयावर ‘रोजगार बचाव’ मोर्चा काढला. यावेळी, महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा निषेध करण्यात येऊन कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली.सकाळी भद्रकाली मार्केटपासून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने फेरीवाले सहभागी झाले होते. त्यात महिला फेरीवाल्यांची संख्या लक्षणीय होती. हाती घोषणाफलक घेत सदर मोर्चा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन धडकला. यावेळी, महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. सदर मोहीम तातडीने बंद करावी, मोहिमेत जप्त झालेला माल ताबडतोब परत मिळावा, फेरीवाला झोन बाबत युनियनने सुचविलेल्या पर्यायांचा विचार करावा, पोलीस बळाचा वापर थांबवण्यात यावा आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. युनियनचे अध्यक्ष शांताराम चव्हाण यांनी फेरीवाला समितीच्या मंजुरीशिवाय झालेल्या ठरावाला स्थगिती देण्याची मागणी केली. तसेच हॉकर्स नोंदणी व शुल्क वसुलीबाबत समितीत चर्चा करूनच निर्णय घेण्याची सूचना करण्यात आली. या आंदोलनात सुनील संधानशिव, जावेद शेख, पुष्पाबाई वानखेडे, नवनाथ लव्हाटे, चंद्रकला पारवे, जया पाटील, पांडुरंग बडगुजर, संजय बर्वे, चित्रा मुसमाडे, नारायण धामणे, राम चव्हाण, प्रशांत कासार आदी सहभागी झाले होते.आयुक्तांच्या भेटीसाठी ठिय्यासकाळी मोर्चा येऊन धडकल्यानंतर फेरीवाल्यांचे शिष्टमंडळ शांताराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेटीसाठी गेले. मात्र, आयुक्तांनी वेळ नसल्याचे सांगत दुपारी ४ वाजता भेटीची वेळ दिली. त्यामुळे, शिष्टमंडळ माघारी फिरले आणि आयुक्तांची भेट होईस्तोवर त्यांनी प्रवेशद्वाराच ठिय्या मांडला होता.
नाशकात फेरीवाल्यांचा महापालिकेवर रोजगार बचाव मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 3:21 PM
निषेध : अतिक्रमणविरोधी कारवाई थांबविण्याची मागणी
ठळक मुद्देसकाळी भद्रकाली मार्केटपासून मोर्चा काढण्यात आलाफेरीवाला झोन बाबत युनियनने सुचविलेल्या पर्यायांचा विचार करावा, पोलीस बळाचा वापर थांबवण्यात यावा आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या