नाशिक - महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदाची माळ अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके यांच्या गळ्यात पडली. त्यांनी शिवसेनेच्या संगीता जाधव यांचा ९ विरुद्ध ६ मतांनी पराभव केला. मनसेच्या कोट्यातून स्थायी समितीवर सदस्य म्हणून नियुक्त झालेल्या अपक्ष मुशीर सैय्यद यांनी गैरहजर राहत अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपाला सहाय्य केल्याची चर्चा रंगली. त्यामुळे विरोधकांत फूट पाडण्यात सत्ताधारी भाजपा यशस्वी झाली आहे.महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी अपर आयुक्त ज्योतीबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके आणि विरोधकांकडून शिवसेनेच्या संगीता जाधव या निवडणूक रिंगणात होत्या. दोघांचे अर्ज वैध ठरविण्यात आल्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला. या कालावधीत भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके यांनी सेनेच्या संगीता जाधव यांच्याकडे जाऊन बिनविरोध निवडीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली. परंतु, संगीता जाधव या निवडणूक लढविण्यावर ठाम राहिल्या. त्यानंतर हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात हिमगौरी अहेर-आडके यांच्या बाजूने भाजपाचे दिनकर पाटील, उद्धव निमसे, भिकुबाई बागूल, भाग्यश्री ढोमसे, मीरा हांडगे, कोमल मेहरोलिया, पुष्पा आव्हाड आणि शांता हिरे यांनी मतदान केले. शिवसेनेच्या संगीता जाधव यांच्या बाजूने प्रवीण तिदमे, भागवत आरोटे, संतोष साळवे, राष्टÑवादीच्या सुषमा पगारे आणि कॉँग्रेसचे समीर कांबळे यांनी मतदान केले. मनसेचे सहयोगी सदस्य मुशीर सैय्यद गैरहजर राहिले. त्यामुळे ९ विरुद्ध ६ मतांनी भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके या विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. हिमगौरी अहेर-आडके यांचा महापौर रंजना भानसी, शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, माजी आमदार वसंत गिते, उपमहापौर प्रथमेश गिते, माजी सभापती शिवाजी गांगुर्डे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, स्थायी समितीचे माजी सभापती बाळासाहेब अहेर आदी उपस्थित होते.
नाशिक महापालिका ‘स्थायी’ सभापतिपदी हिमगौरी अहेर-आडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 2:37 PM
शिवसेना उमेदवार पराभूत : मनसेचा सहयोगी सदस्य गैरहजर, विरोधकांत फूट
ठळक मुद्देशिवसेनेच्या संगीता जाधव यांचा ९ विरुद्ध ६ मतांनी पराभवमनसेच्या कोट्यातून स्थायी समितीवर सदस्य म्हणून नियुक्त झालेल्या अपक्ष मुशीर सैय्यद यांनी गैरहजर राहत अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपाला सहाय्य केल्याची चर्चा