नाशिक - पाणीपट्टी सहज उपलब्ध होऊन त्यासाठी भरणा करण्यासाठी उपयुक्त असलेले एनएमसी ‘वॉटर टॅक्स ॲप’ महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. नागरिक आता ते गुगल प्ले स्टोअर्सवरून डाऊनलोड करून घेऊ शकणार आहेत. अर्थात अशाप्रकारच्या ॲपच्या वापरकर्त्यांना चार टक्के सवलत देण्याची चर्चा कागदावरच राहिली असून, अद्याप अशी काेणतीही घोषणा महापालिकेने केलेली नाही. महापालिकेकडे मुळातच अपुरे मनुष्यबळ आहे. त्यातच जलमापकाचे रिडिंग घेऊन पुन्हा पाणीपट्टीची बिले देण्यात प्रचंड वेळ जात असल्याने महापालिकेने हे ॲप तयार केले आहे. त्यावर लाॅगीन केल्यानंतर स्वत:चा नळ जोडणीचा इंडेक्स भरून इतर माहिती भरल्यावर रजिस्ट्रेशन करता येईल. जलमापकाची रिडिंग घेतलेली इमेज त्यावर मिळेल तसेच बिल मोबाईल आणि ई-मेलवर मिळू शकेल. या सुविधेमुळे महापालिकेला कमी मनुष्यबळात पाणीपट्टीची बिले वाटता येतील, असा दावा करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनादेखील अशाचप्रकारचे ॲप देण्यात आले असून, त्यामुळे मीटर बंद असेल तर, तत्काळ त्याची नोंद घेतल्याने अचुकता येईल, असा महापालिकेचा दावा आहे.
दरम्यान, ॲप आणताना अशाप्रकारचे ॲप वापरून बिल भरणाऱ्यांना चार टक्के सवलत बिलात देण्यात येईल तसेच ज्यांच्याकडे पाणी मीटर बंद असेल त्यांच्याकडून दुपटीने बिल आकारले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र ॲप लाँच करताना त्यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.