नाशिक- सातवा वेतन आयोग आणि अन्य विविध कारणांसाठी नाशिक महापालिकेतील म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने येत्या १७ तारखेनंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा निर्णय मंगळवारी (दि.१६) मागे घेतला आहे. त्यामुळे नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.संघटनेचे अध्यक्ष प्रविण तिदमे व सरचिटणीस राजेंद्र मोरे यांनी ही माहिती दिली. नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसदर्भात गेल्या दोन वर्षांपासून संघटना पाठपुरावा करीत होती. त्यासंदर्भात माजी आयुक्त अभिषेक कृष्ण तसेच तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत बैठका देखील झाल्या त्यातील काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी अन मागण्या अधिका-यांच्या बदल्यांमुळे मागे पडल्या होत्या.
मध्यंतरी म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेने महापालिकेने नोटिस बजावल्यानंतर प्रशासनाने तातडीने बैठक बोलावली आणि मागील मान्य मागण्यांचे इतिवृत्त देण्याचे कबुल केले. परंतु त्यांनतर अत्यंत मोघम स्वरूपात मागण्या मान्य केल्याचे आढळल्याने संघटनेने ठोस मागण्या मान्य करा अन्यथा १० जूलै नंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याची नोटिस दिली होती. परंतु महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.१६) आयुक्तांनी सातवा वेतन लागु करण्याचे आश्वासन दिले.
तसेच अन्य शासन स्तरावरील मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आणि महापालिकेच्या पातळीवर मागण्या मान्य करण्यासाठी अतिरीक्त आयुक्त (शहर) आणि उपआयुक्त (प्रशासन) यांची समिती नियुक्त केली. त्यासंदर्भातील परिपत्रक मंगळवारी (दि.१६) संघटनेला मिळाले. त्यामुळे दुपारी सेनेची आणि अन्य संघटना पदाधिकाºयांची बैठक झाली. यात झालेल्या चर्चेनुसार संप मागे घेण्यात आला आहे.