नाशिक : सध्या संसर्गजन्य आजारांमुळे निर्माण झालेली परिस्थिती बघता अशाप्रकारच्या आजारासाठी स्वतंत्र रुग्णालय बांधण्याची सूचना स्थायी समितीचे नूतन सभापती गणेश गिते यांन प्रशासनाला दिल्या आहेत. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही गिते यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गिते यांची समितीच्या सभापतिपदी बुधवारी (दि.८) निवड घोषित केली त्यानंतर गिते यांनी गुरुवारी (दि. ९) सभापतिपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, माजी महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर गिते यांनी अधिकाऱ्यांची कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, मनपाची अन्य रुग्णालये आणि तपोवन रुग्णालयात औषधांची ताजी स्थिती काय आहे हे तपासून घ्यावे आणि गरजेनुसार औषधे तसेच जंतुनाशके खरेदीसाठी अल्पमुदतीच्या निविदा मागवून घ्याव्यात, असेही गिते यांनी सांगितले. मनपाच्या वतीने वापरण्यात येणारी जंतुनाशके आणि अन्य बाबतीत आढावादेखील गिते यांनी घेतला. त्याचबरोबर विभागनिहाय आरोग्य तपासणी केंद्रे सुरू करून त्यानुसार नागरिकांची आरोग्य तपासणी करावी तसेच नागरिकांना वैद्यकीय उपचार करावेत, असेही गिते यांनी सांगितले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त बी. जे. सोनकांबळे, शहर अभियंता संजय घुगे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे, सहायक आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे, डॉ. कल्पना कुटे, डॉ. प्रशांत शेटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते.
नाशिक मनपा उभारणार रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 9:20 PM