- सुयोग जोशीनाशिक - गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लेझरमुळे शहरातील चार रूग्णांवर खासगी हॉस्पिलकडून उपचार करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अहवालाव्दारे कळविली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने वैद्यकीय विभागाकडे माहिती मागितली होती.
मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर तिव्र स्वरूपाच्या लेझरचा वापर करण्यात आला. यामुळे तरूणांच्या डोळ्यात रक्त साचल्याचे काही केसेस शहरातील नेत्ररोग तज्ज्ञांकडे आढळून आले होते. संबंधित तरुणांना अंधूक दिसू लागले असून, अशा रुग्णांनी नेत्र तज्ज्ञांकडे तपासणी केल्यानंतर त्या रुग्णांच्या नेत्रपटलावर रक्त साचून भाजल्यासारख्या जखमा, तसेच रक्त साकळल्याचे निदर्शनास आल्याची माहिती शहरातील नेत्ररोग तज्ज्ञांनी सांगत लेझरवर बंदीची मागणी केली होती. या घटनेमुळे मिरवणुकीतील डीजे आणि लेझरच्या वापरावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नाशिकमध्ये याबाबत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. गणेश भामरे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन कासलीवाल, नाशिक नेत्ररोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजित खुने, सचिव डॉ. अर्पित शहा यांनी घटनेबाबत अनेक बाबी निदर्शनास आणून दिल्या. मिरवणुकीत डीजे, तसेच लेझर शो यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. लेझर शो बघितल्याने, तसेच हिरव्या रंगाचा लेझरचा थेट डोळ्याशी संबंध आल्यानेच संबंधितांच्या डोळ्यांना कमी, अधिक गंभीर स्वरूपाची बाधा झाल्याचे नेत्ररोग तज्ज्ञांनी सांगितले. नेत्रपटलावर या प्रकारचे लेझर बर्न हे केवळ सूर्यग्रहणाने किंवा अशा प्रकारच्या तीव्र लेझर किरणांमुळेच होणे शक्य असल्याने अशा गोष्टी टाळण्याची गरज असल्याचे नेत्ररोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाला ३ ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून रोषणाईवर तातडीने बंदी आणण्याबाबतचे पत्र सादर करत अहवाल मागविला होता. त्यावर आरोग्य वैद्यकीय विभागाने ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून वैदयकीय विभागामार्फत मिरवणुकीत डीजे आणि बॅँड यांच्यावरील रोषणाईवर बंदी आणण्याचे कामकाज केले जात नसल्याचे कळविले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचाा पत्राच्या अनुषंगाने आरोग्य वैद्यकीय विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील मनपा व खासगी हॉस्पिटलकडून माहिती मागविली. त्यावर प्राप्त झालेल्या माहितीनुसार मिरवणुकीमध्ये जाऊन आल्यावर डोळ्यांना त्रास झाल्याने बापये हॉस्पिटल नाशिक येथील बाह्यरूग्ण कक्षात एक रूग्ण व नेत्रज्योती आय हॉस्पिटल येथून रेटीना आय क्लिनीक येथे रेफर झालेले व तेथील ओपीडीमध्ये तीन रूग्ण असे एकूण चार रूग्णांना उपचार दिल्याचे अहवालात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अहवाल सादर केला आहे. त्यानुसार येणाऱ्या सुचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.- डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक, मनपा