- धनंजय रिसोडकर नाशिक : दिलीप महादू गावित याने पॅरा एशियन गेम्समध्ये ॲथलेटीक्स या क्रीडा प्रकारात टी ४७ श्रेणीतील ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक पटकावून देत चीनमध्ये भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याचा मान मिळवला. दिलीपच्या या कामगिरीमुळे २०२४ च्या पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला असल्याने याच्या या कामगिरीचे कौतुक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर शुभेच्छा देऊन व्यक्त केले आहे.
दिलीप हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील तोरणडोंगरी या आदिवासी पाड्यावरील खेळाडू आहे. उजव्या हातावर कोपरापासुन तो दिव्यांग आहे. गत सात वर्षापासून नाशिकचे ॲथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी त्याला क्रीडा कामगिरीसाठी दत्तक घेतले होते. दिलीपच्या निवासासह स्पर्धेच्या आणि दैनंदिन सरावातील डाएटचा खर्चदेखील वैजनाथ काळे यांनी गत सात वर्षापासून केलेला आहे. एशियन स्पर्धेत थेट सुवर्णपदक पटकावल्यामुळे दिलीप हा २०२४ मध्ये पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिक या स्पर्धेसाठी देखील पात्र झाला आहे. त्यामागे दिलीपसह प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचे सात वर्षांपासूनचे अथक प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे दिलीपने पॅरा ऑलिम्पिक या क्रीडा प्रकारात ४०० मीटरमध्ये भारताला कोटा मिळवून देत क्वालिफाय केले. त्यामुळे दिलीप आणि प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पंतप्रधानांनी केले कौतुकपॅरा एशियन गेमच्या शेवटच्या दिवशी दिलीपने सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दिलीपची कामगिरीची दखल घेत दिलीपची पोस्ट ट्विटरवर शेअर करीत त्याचे अभिनंदन केले.ही बाब नाशिकसह देशासाठी अभिमानास्पद आहे.