नाशिक - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यासाठी वारसांना ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो; परंतु कोरोना मयताच्या पश्चात ५० हजारांच्या आर्थिक मदतीसाठी दोन भाऊ इतकेच कशाला दोन्ही बहिणींकडूनही दावा करण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर पहिला अर्ज आलेल्यांना मदत देण्यात आली आहे. मात्र, आता या पैशांसाठी नात्यांमधील हे वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचण्याची वेळ आली आली आहे.
काेरोना रुग्णाच्या वारसाला मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या मदतीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत, तर काहींनी दोन जिल्ह्यांमधून अर्ज दाखल केले आहेत. हा प्रकार उघड झालाच, शिवाय पैशांपायी नात्यांमधील लालसेचा संसर्गही समोर आला आहे.
या कारणांमुळे नाकारले अर्ज
१) एकाच कुटुंबातील दोन अर्ज आल्याने त्यातील नंतर दाखल झालेला अर्ज नाकारण्यात आला आहे.
२) पहिला अर्ज दाखल झाल्यानंतर काहींनी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना आपसात हे प्रकरण मिटवावे लागणार आहे.
३) काहींनी अपूर्ण आणि चुकीची माहिती भरली, त्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरले.
४) कोरोना मृत्यूचे सक्षम पुरावे नसल्याने
कोरेानामुळे झालेले मृत्यू : ८८८९
एकूण अर्ज : १४५४५
मंजूर अर्ज : ८९९४
नामंजूर अर्ज : ८५३
ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करताना अनेकांच्या चुका झाल्या आणि काही अर्ज इतर जिल्ह्यांच्या यादीमध्ये नोंदले गेले. काही अर्ज तर थेट बीएमएसच्या यादीत आले. असे अर्ज त्यांनी पुन्हा नाशिकला पाठविले आहेत. मात्र, अर्जातील त्रुटीमुळे अनेक घोळ झाले आहेत. मात्र, अर्जदारांना त्याची कल्पना नसल्याने त्यांच्याकडून आर्थिक मदतीबाबत विचारणा केली जाते. महापालिका स्तरावरदेखील अर्जांच्या बाबतीतील अनेक तक्रारी आहेत.
वारसांच्या वादामुळे निर्माण झालेला पेच हा कुटुंबीयांना आपसातच सामंजस्याने सोडवावा लागणार आहे. प्रथम आलेला अर्ज प्रशासन ग्राह्य धरत असल्यामुळे वारसांनी आपसात सामंजस्य दाखविणे अपेक्षित आहे; परंतु जर एकाच कुटुंबातील दोघांनीही अर्ज केले असतील आणि अशी बाब लक्षात आली, तर प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ शकते. शिवाय दिलेल्या रकमेची वसुली केली जाऊ शकते.